Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील हिमायतबाग कट्टा परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी आढळून आलेल्या मृतदेहाचा खुलासा झाला असून, बहिणाला सतत मारहाण करणाऱ्या भावोजीची मेहुण्याकडून हत्या करण्यात आल्याच पोलीस तपासात समोर आले आहे. हिमायतबाग परिसरात काल एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांनतर वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अधिक तपास करत अवघ्या एक दिवसात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सुधाकर नारायण चिपटे (43, रा. सांगले कॉलनी) असे मृताचे नाव असून, राजेश संतोष मोळवड़े असे आरोपीचे नाव आहे.
सुधाकर चिपटे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचा. त्याला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी दारू पिऊन पत्नीशी वाद घालून तिला मारहाण करायचा. दरम्यान सहा महिन्यापूर्वी राजेश मोळवडे बहिणीच्या शेजारीच भाड्याच्या घरात राहण्यासाठी आला होता. यावेळी बहिणीला भावोजीकडून सतत होणारी मारहाण पाहून त्याला प्रचंड राग यायचा. त्यामुळे त्याने भावोजीचा गेम करण्याचं ठरवलं. त्यानुसार शनिवारी रात्री घरी कोणी नसल्याची संधी पाहून राजेशने सुधाकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. ज्यात सुधाकरचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह पोत्यात टाकून नेले...
राजेशने सुधाकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शक्कल लढवली. आधी सुधाकरचा मृतदेह पांढऱ्या गोणीत टाकले. त्यांनतर गोणीवर आणखी एक पोत चढवत मृतदेह मोपेडवरून घेऊन हिमायबागमध्ये पोहचला. मृतदेहाची ओळख पटू नयेत म्हणून पेटवून दिला. पण मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जवळच असलेल्या एका फार्म हाउसवरील कामगार हे लघुशंकेसाठी उठला असता, त्यांना आग लागल्याचे दिसले. त्यांनतर हा सर्व प्रकार समोर आला.
असा अडकला आरोपी....
शनिवारी रात्री मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर पोलिसांसमोर ओळख पटवणे मोठं आव्हान होते. मात्र पोलिसांनी या परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची पाहणी केली. यावेळी बाजूला असलेल्या फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ॲक्टिव्हा गाडीवरून एक व्यक्ती मृतदेह घेऊन येताना स्पष्ट दिसून आला. त्यांनतर पोलिसांनी आणखी काही सीसीटीव्हीची तपासणी करत, आरोपीची ओळख पटवली. आरोपी स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तर बहिणीला सतत होणाऱ्या मारहाणीचा बदला म्हणून, मेहुण्याकडूनच भावोजीची हत्या करण्यात आल्याच पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.