Aurangabad Politics: राज्याच्या राजकारणात एक मोठं नाव असलेले आणि सद्या केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर त्या आपल्या पती हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्याविरोधात कन्नड विधानसभा मतदारसंघातून (Kannad  Assembly Constituency) निवडणूक लढवण्याच्या चर्चेने जोर धरलाय. विशेष म्हणजे कन्नड मतदार संघातून विधानसभा निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केल्याचे देखील पाहायला मिळत आहे. 


रावसाहेब दानवे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. त्यामुळे दानवे आपल्या कन्येला कन्नड मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मात्र अशात कन्नड-सोयगाव मतदार संघात संजना जाधव यांच्याकडून स्वतःची कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचे काम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्या विविध सामाजिक उपक्रम, जत्रा, लग्न समारंभ यांना आवर्जून हजेरी लावतांना दिसून येत आहे. तर कन्नडमध्ये त्यांना मानणारा वर्गही मोठा असल्याने त्यांच्या भेटीगाठीची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. 


बेबनाव अनेकदा माध्यमांसमोर 


संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील कौटुंबिक वाद अनेकदा माध्यमांसमोर आला. पुढे हे प्रकरण पोलिस ते न्यायालयात गेल्याच्या देखील दावा हर्षवर्धन जाधव यांनी बोलून दाखवले. विशेष म्हणजे या काळात संजना जाधव यांच्यासह रावसाहेब जाधव यांच्यावर देखील हर्षवर्धन जाधव यांनी अनेकदा आरोप केले होते. आता याच बेबनावातूनच संजना जाधव यांनी स्वतःची वेगळी राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून कन्नड विधानसभेची तयारी सुरु असल्याचे देखील बोलले जात आहे. 


संजना जाधवांसाठी शिंदे गटाचा पर्याय? 


कन्नड विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहेत. गेल्यावेळी शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र आता राजपूत ठाकरे गटात आहे. तर युतीच्या अनुषंगाने विचार केल्यास संजना जाधव या शिंदे गटाकडून रिंगणात उतरू शकतात असेही बोलले जात आहे. त्यामुळे संजना जाधव या भाजपकडून रिंगणात उतरतील की, शिंदे गट हे येणारा काळच सांगेल. 


गेल्यावेळी असा रंगला होता सामना...


मनसे, शिवसेना असा प्रवास केल्यानंतर 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. तर याचवेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत रिंगणात होते. मात्र प्रचार काळात जाधव यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केल्याने, राज्यभरात त्यांच्याविरोधात संताप पाहायला मिळाला होता. तर कन्नड तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांना देखील हे वक्तव्य जिव्हारी लागला होता. त्यामुळे जाधव यांच्याविरोधात शिवसैनिक एकवटले आणि त्यांचा पराभव केला.