Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून, भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी झाल्याच्या निमित्ताने आज जल्लोष साजरा केला जाणार आहे. मात्र या विजयाचे पडसाद आता स्थानिक राजकीय पातळीवर उमटताना पाहायला मिळत आहे. कारण औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवर भाजपकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे. 


राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेली लढत शिवसेना-भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. त्यात भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेत भाजपकडून या विजयाचे निमित्ताने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुलमंडीवर भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. सकाळी साडेअकरा वाजता गुलमंडीवर भाजपकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. 


जल्लोषाचे ठिकाण बदलले...


सुरवातीला भाजपकडून गुलमंडीवर जल्लोष करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याबद्दल माध्यमांना माहिती सुद्धा देण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जल्लोष होणार असल्याची चर्चा झाल्याने आणि काही गोंधळ उडू नयेत म्हणून जल्लोषाच्या ठिकाणात बदल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या उस्मानपुरा येथील मध्यवर्ती कार्यालयात हा जल्लोष साजरा करण्यात आला. 


महाविकास आघाडीची 10 मतं फुटली


सगळ्यात धक्कादायक म्हणजे  या निवडणुकीत महाविकास आघाडीची 10 मतं फुटली आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. महाविकास आघाडीनं शक्तीप्रदर्शन केलं, चार उमेदवार जिंकणार असे दावे केले. पण देवेंद्र फडणवीसांनी पडद्याआड राहुन निवडणुकीचं प्लॅनिंग केलं. मतदानाच्या काही तास आधी आमदारांना विश्वासही दिला आणि तोच विश्वास निकालानंतर खरा ठरला.