Aurangabad News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र त्यांनतर यावरून राजकीत वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. सरकारच्या या निर्णयालाविरोध करण्यासाठी MIM कडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधील नेत्यांनी या निर्णयामुळे नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 


MIM ची भूमिका....


नामांतराच्या निर्णयावर प्रतिक्रिया देतांना MIM चे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, सत्ता जात असताना यांना संभाजीराजेंची आठवण आली. त्यामुळे नाव बदलता येऊ शकतात पण इतिहास बदलता येत नाही. जेव्हा नामांतराचा निर्णय घेतला जात होता तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील दलाल कुठे होते, या शब्दात जलील यांनी टीका केली. सोबतच या निर्णयाच्या विरोधात गरज पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जलील यांनी दिला.तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसचे नेत्यांना आम्ही रस्त्यावरून फिरू देणार नसल्याचा इशारा सुद्धा यावेळी जलील यांनी दिला. 


काँग्रेस नेत्याचा राजीनामा....


औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणताही विरोध करण्यात आला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर शहरातील आणखी काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याच समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना पाहायला मिळत आहे. 


शिवसेनेकडून जल्लोष....


मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळताच औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला. शहरातील टीव्ही सेंटरवर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांची गर्दी पाहायला मिळाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला.