औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता प्रशासनाने पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. 30 मार्चच्या मध्यरात्रीपासून आठ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत म्हणजे संपूर्ण 10 दिवसांसाठी हे लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाबी बंद राहणार आहेत. राज्यातील महानगरातील औरंगाबाद पहिलं शहर आहे. ज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार आहे.
अगदी किराणा मालाचे दुकान, दूध हे सुद्धा दुपारी बारावाजेपर्यंत उपलब्ध असतील आणि त्यानंतर पूर्णतः बंदी असेल. नागरिकांनी घराबाहेर पडायचं नाही अथवा गुन्हे दाखल होणार अशा पद्धतीचा इशारा प्रशासनाने दिला आहे. औरंगाबादमध्ये दिवसाला अठराशे रुग्णांची नोंद होत आहे. औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर प्रशासनाने कठोर निर्णय घेतलेला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे उद्योगांना या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.
राज्यात उद्यापासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी
लॉकडाऊन दरम्यान काय सुरू काय बंद
काय काय असेल बंद
- कोणत्याही परिस्थितीत 5 पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक जागेत एकत्र येण्यास प्रतिबंध असेल.
- सार्वजनिक/खाजगी क्रीडांगणे/मोकळ्या जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी सकाळचा फेरफटका, सायंकाळाचा फेरफटका इत्यादी प्रतिबंधीत राहिल.
- उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्स (कोव्हीड-19 करिता वापरात असलेले वगळून) रिसॉर्ट, शॉपींग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णतः बद राहतील.
- हॉटेल मधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग) बंद राहिल मात्र निवासी असलेल्या यात्रेकरुना त्यांच्या खोलीमध्ये भोजन व्यवस्थेस परवानगी राहिल.
- सर्व केश कर्तनालय/सलुन/ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद राहतील.
- शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. तथापी ऑनलाईन वर्ग सुरु राहतील.
- स्थानिक, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी परिशिष्ठ ‘ब’ मध्ये नमूद केलेल्या सुट व्यतिरिक्त संपूर्णतः बंद राहतील. तथापी, अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर पूर्णवेळ अनुज्ञेय राहिल. अॅटोमध्ये फक्त 2 प्रवाशांना मास्क सह प्रवास अनुज्ञेय राहिल.
- स्थानिक (Local), सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादींसाठी संपूर्णतः बंद राहतील तथापी, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे औरंगाबाद महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचारी व वाहनांना सदरच्या आदेशानुसार वगळण्यात येत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक/किरकोळ वाहतूक सदरच्या आदेशातून वगळण्यात येत आहे. सार्वजनिक व खाजगी जीवनावश्यक सेवांची तथा इतर वाहतूक (उदा. दूध, किराणा माल,पेट्रोल, डिझेल,गॅस, उद्योगांना इ.)सुरु राहिल.
- सर्व प्रकारचे बांधकाम/कन्स्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद राहतील, तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था (On – Site Construction) असेल तरच त्यांना काम सुरु ठेवता येईल.
- सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,जलतरण तलाव,करमणूक उदयोग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद राहतील.
- मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असे कार्यक्रम सार्वजनिकरित्या करता येणार नाहीत. या आदेशानुसार लागू करण्यात येत असलेल्या संचारबंदीच्या कालावधीत केवळ नोंदणीकृत विवाह (Registered Marriage) अनुज्ञेय असेल.
- सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम व सभा संपूर्णतः बंद राहतील.
- धार्मिक स्थळे/सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. तथापी नियमित दैनंदिन धार्मिक विधी पुजाअर्चा चालू राहतील. याकामी संबंधीत पुजारी/धर्मगुरु/पाद्री इ. यांचेसह फक्त एका व्यक्तीस परवानगी राहिल.
- सर्व प्रकारचे मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण इ. वर निर्बंध राहतील.
- सर्व देशी/विदेशी वाईन इ.मद्य विक्रीचे दुकाने बंद राहतील.
- विविध निवडणूकीच्या निकालानंतर विजयी मिरवणूकीस बंदी असेल.
खालील अत्यावश्यक बाबी/सेवा मर्यादीत स्वरुपात व निर्बंधासह सुरु राहतील
- सर्व सामान्य नागरिकांसाठी परजिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेशाकरिता अँटीजेन/RT-PCR तपासणी केलेली असणे (जर अशी टेस्ट मागील 72 तासामध्ये केलेली नसेल तर) बंधनकारक आहे. अँटीजेन/RT-PCR तपासणी न करता प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही.
- लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तींना लसीकरण केंद्रापर्यंत एकदा जाण्यासाठी मुभा राहिल.त्यासाठी योग्य ते ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे. वृध्दाकरिता लसीकरणासाठी सोबत फक्त एक सहायक असण्याची परवानगी राहिल.
- वृद्ध व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस/पेंशटचे Bedside सहाय्यक यांच्या सेवा सुरु राहतील. तसेच त्यांच्या आवागमनास परवानगी असेल.
- नागरिकांनी फक्त किराणा /भाजीपाला/दूध इ.खरेदी साठी खालील नमूद वेळामध्ये घराबाहेर पडावे. इतर वेळी फक्त आपतकालिन वैद्यकीय कारणासाठी किंवा या आदेशात नमूद सुट दिलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये.
उद्योगा बाबत काय आहेत निर्णय.
- सर्व प्रकारचे उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील.
- औद्योगिक व इतर वस्तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक, शासकीय नियमानुसार सुरु राहिल औरंगाबाद जिल्हा औद्योगिक असल्याने कच्या व पक्का मालाची वाहतूक निरंतर करता येईल. औरंगाबाद जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात इतर जिल्ह्यात जाणा-या माल वाहतूक वाहनांना प्रवेश अनुज्ञेय राहिल. मात्र त्यांना जिल्ह्यात कोठेही थांबता येणार नाही.
- दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल /प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6.00 ते 11.00 या वेळे मध्येच सुरु राहिल.
- इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसबंधी सेवा पुरविणा-या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकते नुसार सुरु ठेवता येईल.
- सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे CSC नियमानुसार वेळेप्रमाणे सुरु राहतील.
- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी शक्यतो Work From Home चा पर्याय वापरावा.
- लॉकडाऊन दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी असलेल्या आस्थापना/कारखाना/दुकाने इत्यादी मधील मालक/अधिकारी/ सेवक/कामगार/मजूर यांना दर पंधरा दिवसांनी RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट करणे बंधनकारक असून तसे प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे.
- RT-PCR/ रॅपीड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची जबाबदारी संबंधीत आस्थापना/दुकान/कंपनी यांची राहिल.