Chhatrapati Sambhajinagar Crime News: सर, माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत, प्लीज पप्पांना वाचवा, अशी विनवणी करत 13 वर्षांची चिमुकली धापा टाकत थेट सोयगाव पोलीस ठाण्यात (Soygaon Police Station) पोहचली. तर पोलिसांनी सतर्कता दाखवत संबंधित व्यक्तीचे घर गाठून गळफास लावला असताना धावत जाऊन त्याचे प्राण वाचविल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) सोयगाव शहरात शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. तर या घटनेनंतर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव पोलिस ठाण्यातील कर्मचारी नियमितपणे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास कामकाज करीत होते. यावेळी एक 13 वर्षीय मुलगी धापा टाकत पोलीस ठाण्यात पोहचली. तसेच ठाणे अंमलदार चंद्रकांत दौड यांच्याकडे जात तिने सर, माझे पप्पा आत्महत्या करण्यासाठी घरावर चढले आहेत, आई शेतात कामाला गेली आहे, प्लीज पप्पांना वाचवा, अशी व्याकुळतेने विनवणी केली. 


पोलीस ठाण्यात आलेल्या मुलीने आपले वडील आत्महत्या करत असल्याचे सांगताच, पोलीस कर्मचारी दौड यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्री नाकाबंदीसाठी बंदोबस्तवर असलेल्या पोलीस अंमलदार गणेश रोकडे यांना फोन वर संपर्क करून माहिती दिली की, एक इसम भवानीपुरा येथील राहते घरी आत्महतेचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तुम्ही लवकर जा असे रोकडे यांना कळविले. तर माहिती मिळताच पोलीस अंमलदार गणेश रोकडे हे घटनास्थळी पोहचले. 


पोलिसांना पाहताच दोरी गळ्यात घालून उडी घेतली


मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रोकडे घटनास्थळी पोहचले. यावेळी संबंधित 38 वर्षीय व्यक्ती बाल्कनीत पाइपला गळफास लावून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. तर पोलिसांना पाहून त्या व्यक्तीने बांधलेली दोरी गळ्यात घालून पटकन उडी घेतली. तेव्हा पळत जाऊन रोकडे यांनी या व्यक्तीला उचलून धरले. त्यानंतर त्यांना काय करावे सुचत नव्हते. यावेळी त्यांना घराच्या खालील बाजूस असलेल्या रिक्षा स्टँडवर चार ते पाच व्यक्ती थांबलेले दिसले.  रोकडे यांनी त्यांना मदतीसाठी आवाज दिला. त्यांनी धावत येऊन पाइपचा दोर कापून संबंधित व्यक्तीला खाली उतरवले. त्यानंतर त्यास धीर देऊन त्याला उपचारासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ठाणे अंमलदार दौड व पोलिस अंमलदार रोकडे यांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. याबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जी-20 च्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून औरंगाबाद जिल्ह्यात 1400 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त