J P Nadda Public Meeting: मागील दोन दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु होती. नड्डा हे औरंगाबादच्या जाहीर सभेत (Aurangabad Public Meeting) काय बोलणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रत्यक्षात झालेल्या सभेनंतर नड्डा यांच्या भाषणापेक्षा त्यांच्या सभेला खाली असलेल्या खुर्च्यांचीच अधिक चर्चा पाहायला मिळत आहे. कारण या सभेला गर्दीच जमली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सोबतच सभेच्या ठिकाणी खाली असलेल्या खुर्च्यांचे व्हिडिओ, फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ज्या औरंगाबाद शहरात ही सभा झाली त्या औरंगाबाद जिल्ह्याला भाजपचे दोन केंद्रीय आणि एक राज्यातील कॅबिनेट मंत्री लाभले आहेत. 


आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान याच अनुषंगाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सोमवारी महाराष्ट्र दौरा करत चंद्रपुर आणि औरंगाबादमध्ये सभा घेतली. या सभेतून भाजपकडून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला. मात्र औरंगाबादच्या सभेत मोठी तयारी करून देखील भाजपला गर्दी जमवता आली नाही. विशेष म्हणजे ज्या औरंगाबाद शहरात ही सभा झाली त्या औरंगाबादला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याच्या सरकारमध्ये सहकार मंत्री असलेले अतुल सावे असे तीन भाजपचे मंत्री लाभले आहेत. पण असे असतांना देखील भाजपला जेपी नड्डा यांच्या सभेला गर्दी जमवता आली नाही. 


सभेला 25 हजारांची गर्दी 


जेपी नड्डा यांच्या सभेला खुर्च्या खाली असल्याच्या आरोपांवर बोलतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कुठेही खुर्च्या खाली नव्हत्या. महिला सभेसाठी संध्याकाळी चार वाजेपासून थांबल्या होत्या. मात्र आठ वाजता शहरात पाण्याचा प्रश्न असल्याने काही महिला निघून गेल्या. मात्र असे असले तरीही किमान 25 हजार लोकं या सभेसाठी उपस्थित होते असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 


दानवेंची टीका...


नड्डा यांच्या सभेला गर्दी झालीच नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर दानवे यांच्या सभेचा व्हिडिओ,फोटो देखील दानवे यांनी ट्वीट केला आहे. तर,'अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे', असेही दानवे यांनी आपल्या ट्वीट मधून म्हंटले आहे. 


आणखी वाचा:


'अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा', औरंगाबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं भाषण सुरु होताच खुर्च्या रिकाम्या