Maharashtra Aurangabad News : औरंगाबादसह (Aurangabad) मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवाळीसारखा (Diwali 2022) सण कसा साजरा करावा, असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी अशाच एका शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली. सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील आत्महत्याग्रस्त उबाळे आणि अन्वी येथील गाढवे या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना दिवाळीनिमित्त कपडे, फटाके, मिठाई , जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट देत कृषिमंत्री सत्तार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. तसेच उबाळे कुटुंबासह अन्वी येथील आत्महत्याग्रस्त गाढवे यांच्या वारसाला शासनाच्या वतीनं प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री सत्तार यांच्या हस्ते देण्यात आला.


घरातील कर्ता पुरुष गेल्याने दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट होते. त्यात शेतात झालेल्या नुकसानीने आर्थिक परिस्थितीसुद्धा दिवाळी साजरी करण्यासारखी राहिली नाही. त्यामुळे उबाळे आणि गाढवे दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याचवेळी कृषिमंत्री यांनी या दोन्ही कुटुंबाला भेट देऊन त्यांची दिवाळी गोड केली. तर कृषिमंत्री आपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी आल्याने पीडित कुटुंबाला धीर मिळालाच, शिवाय काही अंशी दुःखातून देखील पीडित कुटुंबाला सावरण्यासाठी मदत झाली. तर या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घरकुल आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देवू, असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.


पाहा व्हिडीओ : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी साजरी केली शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी



सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या...


सिल्लोड तालुक्यातील मोढा बुद्रुक येथील शेतकरी विश्वास तेजराव उबाळे ( वय 37 ) यांनी 11 सप्टेंबर रोजी आणि अन्वी येथील शेतकरी भास्कर रतन गाढवे ( वय 37 ) या शेतकऱ्याने 12 सप्टेंबर रोजी सततची नापिकी आणि कर्जबाजारी पणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपविली होती. तर मयत विश्वास उबाळे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली , आई वडील, भाऊ असा परिवार आहे. तर अन्वी येथिल मयत भास्कर गाढवे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व आई वडील असा परिवार आहे. 


आत्महत्या हा पर्याय नाही....


यावेळी बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले की, सततची नापिकी व कर्जबाजारीपणा यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही नसून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त व त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. प्रत्येक संकटावर मार्ग आहे. संकटे येतात , जातात मात्र आत्महत्या पर्याय नाही. आत्महत्या मुळे आपल्या कुटुंबाचे प्रश्न सुटत नाहीत, उलट यात वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केले.