Aurangabad Crime News : औरंगाबाद शहरातील नारेगाव भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून मैत्रिणीला घरी बोलावून तिची मित्राकडूनच क्रूर हत्या करण्यात अली आहे. रेणुका देविदास ढेपे ( वय १९, रा. ब्रिजवाडी ) असे मृत मुलीचे नाव आहे. तर तिचा मित्र शंकर विष्णू हागवणे ( वय २४ ) हा फरार झाला आहे. आधी गळा आवळून आणि त्यांनतर डोक्यात जड वस्तूने प्रहार करून रेणुकाचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशियत आरोपी  शंकर हागवणे हा त्याच्या तीन मित्रांसह नारेगावच्या राजेंद्रनगर भागात राहत होता. तर रेणुका ही शेजारील ब्रिजवाडीत आई-वडिलांसोबत राहत होती. दरम्यान कोरोनाच्या काळात शंकर हा ब्रिजवाडी भागात भाजीपाला विक्रीसाठी नेहमी येत असल्याने यावेळी दोघांची मैत्री झाली.त्यामुळे रेणुका अनेकदा शंकर याला भेटण्यासाठी तो राहत असलेल्या रूमवर यायची. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्यादरम्यान शंकरचे रूमपार्टनर घरी आले असता त्यांना रेणुका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. त्यांनतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. 


मैत्री की  प्रेमसंबंधातून हत्या ?


शंकर आणि रेणुका हे दोन्ही चांगले मित्र असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर रेणुकाचा खून झाल्यापासून शंकर हा फरार आहे. त्यामुळे रेणुकाची हत्या मैत्री की प्रेमसंबंधातून झाली याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. तर यासाठी तीन पथक तयार करण्यात आले असून शंकर सापडल्यावरच या हत्येच्या उलगडा होणार आहे.


अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही... 


पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना केला आहे. तर आज सकाळपासूनच मृताच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी घाटी रुग्णालययात गर्दी केली आहे. तर मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घ्यावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे परिस्थिती पाहता पोलिसांकडून घाटी रुग्णालयात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.