Aurangabad Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील एका आगळ्यावेगळ्या चोरीची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एका पेट्रोल पंपावर कापसाने भरलेला आयशर ट्रक चोरांनी पळवून नेला. मात्र पुढे टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी पाचशे रुपये नसल्याने त्यांनी तिथेच वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, याचवेळी मागून गस्तीवरील पोलिसांचे वाहन आल्याचे पाहून, चोर आयशर ट्रक तिथेच सोडून पळाले. त्यानंतर पोलिसांनी हा आयशर ट्रक ताब्यात घेतला असून, चोरांचा देखील शोध घेतला जात आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील राजेद्र तुकाराम दौड यांच्याकडे आयशर ट्रक (एमएच 21 बीएच 3024) आहे. दरम्यान, शनिवारी काही शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी नेण्यासाठी राजेद्र दौड यांच्या आयशरमध्ये जवळपास 7 लाख 66 हजार रुपये किमतीचा 95 क्विंटल कापूस भरला होता. दरम्यान, हा कापूस सिल्लोड येथील जिनिंगमध्ये विक्रीसाठी नेत असताना आयशर चालकाने गाडी औरंगाबाद जळगाव महामार्गावरील आदित्य पेट्रोल पंपावर रात्री 8 वाजेच्या सुमारास उभा केली होती. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी हा आयशर ट्रक पळवला. तर सकाळी जेव्हा चालक पेट्रोलपंपावर गेला त्यावेळी ही घटना समोर आली होती. त्यानंतर मालक तुकाराम दौड यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 


टोल नाक्यावर टोल देण्यासाठी पाचशे रुपये नव्हते


दरम्यान, चोरीची आयशर घेऊन निघालेले चोरटे कन्नड तालुक्यातील हतनूर टोल नाक्यावर पोहचले. मात्र यावेळी या चोरट्यांकडे पाचशे रुपये टोल देण्यास नव्हते. यावरून चोरटे आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांत वाद झाला सुरू झाला. पण याचवेळी पाठीमागून गस्तीवर असलेली कन्नड पोलिसांची गाडी आली. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहून चोरट्यांनी आयशर सोडून धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी आयशर ताब्यात घेतला आहे. 


चोरांचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान 


चोरीला गेलेल्या आयशरचा अजिंठा पोलिसांकडून शोध सुरु असतानाच तो कन्नडच्या हतनूर जवळ आलेल्या टोल नाक्यावर उभा असल्याची माहिती अजिंठा पोलिसांना मिळाली. त्यामुळे अजिंठा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तो आयशर ताब्यात घेतला. तसेच चोरी गेलेल्या आयशरमधील कापूस देखील तसाच असल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.मात्र आयशर चोरणारे चोरटे कोण होते त्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे. यासाठी टोल नाका आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad: पिस्तूलचा धाक दाखवत कापूस व्यापाऱ्याचे 27 लाख रुपये लुटले; सोलापूर-धुळे महामार्गावरील घटना