औरंगाबाद : शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये आज शहर बस वाहतूक सेवेचा शुभारंभ पार पडला. शुभारंभाच्या कार्यक्रमावेळी महापौर नंदकुमार घोडले यांचे भाषण सुरु होते. त्यावेळी अजान सुरु झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी महापौरांना भाषण थांबवण्यास सांगितले. त्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीमुळेच अजान सुरु असताना मी भाषण थांबवण्यास सांगितले.


याबाबत अधिक बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "आज चांगला दिवस आहे. बऱ्याच दिवसांनी युतीचा एक एकत्र कार्यक्रम होत आहे. इम्तियाज जलील यांनी भगवा फेटा बांधला आहे. मी नमाजासाठी थांबलो आहे. असे चित्र खूप कमी वेळा दिसते."

आज उद्घाटन झालेली औरंगाबाद शहर बस सेवा ही बहुचर्चित आहे. कारण ही बस सेवा सुरू करण्यावरुन सेना भाजपाचे मानापमान नाट्य रंगले होते. आजच्या उद्घाटन समारंभातही सेना भाजपाच्या नेत्यांनी एकमेकांना कोपरखळ्या दिल्या. खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी विकास कामाच्या श्रेयावरून एकमेकांना चिमटे काढले.