औरंगाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांची संवेदनशीलता दिसून आली. औरंगाबादेमधील देवगाव रंगारी गावाजवळ एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती आणि तो रस्त्यावर पडलेला होता. राजेश टोपे रात्री एकच्या सुमारास तिथून जात असताना त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी लगेचच आपला ताफा थांबवला आणि जखमी व्यक्तीला आपल्या ताफ्यातील गाडीत बसवून उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली.


आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेहमीप्रमाणे दौऱ्यावर असताना मध्यरात्री औरंगाबादच्या कन्नड तालुक्याती देवगाव रंगारी इथून जालन्याकडे जाताना एका अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात दिला. मध्यरात्री दौरा आटोपून निघालेल्या आरोग्यमंत्र्यांना देवगाव रंगारी गावाजवळ रस्त्यात दुचाकीचा अपघात होऊन विव्हळत पडलेल्या व्यक्ती दिसला. यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवून स्वतः मदत करत ताफ्यातील एक्स्कॉर्ट गाडीने या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर देवगाव रंगारी इथल्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर राजेश टोपे यांनी 108 क्रमांकावर कॉल करुन ॲम्बुलन्सने जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे पाठवलं आणि योग्य उपचार करण्याबाबत कळवलं. दरम्यान जखमी व्यक्तीवर उपचार सुरु असून त्याची तब्येत चांगली असल्याचं समजतं.


आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन
दरम्यान यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना आवाहन केलं की, "प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करुन शासकीय यंत्रणांना सूचित करावं. आपल्या मदतीमुळे अपघात झालेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून प्राण वाचू शकतात."


दत्तात्रय भरणेंची संवेदनशीलता, अपघातग्रस्ताला मदत
याआधी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दत्तात्रय भरणे यांच्याबाबतीत अशीच घटना घडली होती. डिसेंबर 2021 मध्ये दत्तात्रय भरणे इंदापूर दौऱ्यावर असताना इंदापूर-बारामती रस्त्यावर एका दुचाकीस्वार आणि टेम्पोचा अपघात झाला होता. अपघाताची माहिती समजताच दत्तात्रय भरणे यांनी ताफा थांबवला. अपघातातील जखमींची चौकशी करुन त्याला ताफ्यातील गाडीत बसवून तात्काळ रुग्णालयात पाठवलं होतं.