FIR against Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या भाषणावरून पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सभेपूर्वी राज ठाकरे यांना पोलिसांनी काही अटी घातल्या होत्या. या अटींच्या आधारे पोलिसांनी सभेला परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे. आता राज ठाकरे यांच्यासमोर काय पर्याय आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे.
औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन केले असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. औरंगाबाद पोलिसांनी राज यांच्या भाषणाचे विश्लेषण केल्यानंतर आज दुपारी गुन्हा दाखल केला.
राज ठाकरेंवर नेमका कोणत्या कलमांतर्गत गुन्हा?
औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगणे यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार राज ठाकरे हे प्रथम क्रमाकांचे आरोपी आहेत. राज ठाकरेंसह सभेला परवानगी मागणारे राजीव जवळीकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कलम - 116, 117, 153 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 (अटी शर्तींचा भंग करणे)
153 - दोन समूहात भांडण लावणे
116 - गुन्हा करण्यासाठी मदत
117 - गुन्ह्याला मदत करणे, चिथावणीखोर भाषण
>> राज ठाकरे यांच्या समोर पर्याय काय?
राज ठाकरे यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे जामीनपात्र गुन्हे आहेत. राज यांच्याविरोधात भादंवि 153 नुसार गुन्हा दाखल असला तरी हिंसाचाराची घटना न घडल्याने त्यांना 153 ए हे कलम लावण्यात आले नाही. या कलमानुसार दाखल होणारा गुन्हा अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासमोर दोन पर्याय आहेत. राज ठाकरे यांच्याकडून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला जाऊ शकतो. अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यास राज यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही. त्याशिवाय पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरला कोर्टात आव्हान देऊन हा एफआयआर रद्द करण्याची मागणी राज यांच्याकडून केली जाऊ शकते. राज यांच्याकडून आता कोणत्या पर्यायाचा अवलंब केला जातो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.