औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन. त्यानिमित्ताने विद्यापीठ गेटवर भीमसागर एकत्र येऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला देण्यासाठी सुमारे 17 वर्ष आंदोलन झालं. 1994 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.


नामांतराचा लढा

नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता, तर तो समता, स्वातंत्र्य, बंधूभाव पुढे नेणारा लढा होता. विद्यापीठाचं नामांतर हे केवळ आंदोलन नव्हतं, तर त्याला सामाजिक लढ्याचे स्वरुप आलं होतं.

1972 साली दलित पॅंथरची स्थापना झाली. गायरान जमिनी मिळाव्यात, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी, यासारख्या काही मागण्यांसाठी दलित पँथरचं आंदोलन सुरु होतं. त्याबरोबरच औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावे, ही मागणीने जोर धरला. 1974 च्या मराठवाडा विकास आंदोलनात नामांतराची मागणी झाली. दलित युवक आघाडी या नामांतराचा पाठपुरावा करत असे.

1977 ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली. नामांतराचं आश्वासनही दिलं.  1978 ला महाराष्ट्रात सरकार बदललं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार सत्तारुढ झालं होतं. विधान परिषदेत आमदार पा. ना. राजभोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करावे, अशी मागणी लावून धरली. 27 जुलै 1978 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी घोषणा झाली.

दलित पँथर नेते प्रा. अरुण कांबळे यांनी या नामविस्ताराला विरोध दर्शवला होता. पँथरला निर्भेळ नामांतर हवं होतं. रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरु झाल्या. एक-दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता. या आंदोलनात अनेकांनी प्राणांची आहुती दिली.

शेवटी एका विद्यापीठाची फाळणी झाली. एकाला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद' तर दुसऱ्याला 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' अशी विस्तारित नावं दिली गेली. तो नामविस्तार दिन 14 जानेवारी म्हणून मोठ्या उत्साहाने औरंगाबाद येथे साजरा केला जातो.