औरंगाबाद : कोरोनाकाळात शाळा, क्रीडांगण, गार्डन बंद असल्याने मुलांमध्ये वाढलेला स्थूलता हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्गाची अधिक शक्यता वर्तवली जात आहे. यात स्थूल असलेल्या मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचं सांगितले जातंय. त्यामुळे मुलांची काळजी घेताना त्यांचे वजन प्रमाणाबाहेर वाढू नये याकडेही लक्ष देण्याचा विशेष सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


लहान मुलांचे हेच वाढत जाणारे वजन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पालकांची चिंता वाढवतंय. त्यामुळे Child obesity specialist कडे पालकांचा ओढा वाढला आहे. शिवाय आशा सेविकांनी आपापल्या भागामध्ये अशा मुलांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, मुलांमध्ये गंभीर स्वरूपाची काही लक्षणे आढळून आली तर त्याची माहिती तातडीने द्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.


प्रत्येक आशा सेविकेकडे एक विशिष्ट प्रकारचा तक्ता दिला आहे. या तक्त्यामध्ये मुलांचे नाडीचे ठोके, श्वासाचा वेग, लघवीचे प्रमाण, शरीरातील ऑक्सिजनची पातळी, मुलाची शारीरिक आणि मानसिक स्थिती असे काही महत्त्वाचे निकष दिले आहेत. ज्या मुलांमध्ये रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्तीचा आजार तसेच फुफ्फुसाचा आजार, किडनीचा त्रास, यकृतामध्ये बिघाड, लठ्ठपणा असेल त्यांना कोरोनाची लागण झाल्यास अधिक गुंतागुंत होऊ शकते, अशी माहिती डॉ. प्रीती फाटले Child obesity specialist) यांनी दिली.


90 ते 95 टक्के मुलांना सौम्य स्वरूपाचा संसर्ग होईल. या संसर्गावर घरीही वैद्यकीय उपचार देता येतील. त्यामुळे सौम्य स्वरूपाच्या आजारासाठी वैद्यकीय उपचार देताना या मुलांना 14 दिवस घरातून बाहेर पडण्याची संमती देऊ नये. वयस्कर व्यक्तींपासून त्यांना दूर ठेवावे, असा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे कोरोना काळात स्थूल मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे.


आरोग्य तज्ञांनी म्हटले आहे की जास्त वजन आणि लठ्ठपणाची स्थिती कोविड19 चा परिणाम आहे, ज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कोविड 19 मुळे मध्यमवर्गीय आणि उच्च सामाजिक-आर्थिक गटांमधील मुलांमध्ये स्थूलता आली आहे. लॉकडाऊनमुळे मुलांना घरात अडकून राहावे लागत आहे. सोबतच बिस्किट, नूडल्स, आईस्क्रीम, केक्स आणि गोड पेय पदार्थ अशा आहारामुळेही स्थूलता वाढलीय.