BJP MNS Agitation : औरंगाबादमध्ये पाण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात आज पहिल्यांदाच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील सिडको आणि हाडकोतील नागरिकांनी महापालिका पाणीपुरवठ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात दोन्ही पक्ष एकत्र आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.


औरंगाबाद शहरातील सिडको हडकोमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पाणी येत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे सिडको हाडकोतील नागरिकांसह भाजप आणि मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिडकोतील पाणीपुरवठा विभागांमध्ये धडक मारुन आंदोलन सुरु केले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातील लोक सिडकोतील एन 5 इथे पाण्याच्या टाक्याजवळ दिवसभर आंदोलन केले होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालाच नाही. शिवाय प्रत्येकाला 9 ते 10 दिवसांनंतर एकदा पाणी मिळू लागल्यामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. त्यामुले नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.


 यावेळी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, राज्यात भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. दुसरीकडे औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर स्थानिक भाजपचे नेतेही आता मनसेच्या नेत्यांना सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे. या उन्हाळ्यात पाण्यासाठी भाजपने सिडको हाडकोमध्ये आंदोलन लावून धरले आहे. त्यात आता भाजपला मनसेनेही साथ दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाने जर लवकर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करु असा इशारा देखील मनसेच्या नेत्यांनी दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: