पुणे: गेली 15 वर्षे ज्यांना भोंग्याचा त्रास झाला नाही त्यांना आपला भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास सुरू झाला, हा पोटदुखीतून सुरू झालेला त्रास आहे असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते. आज जागतिक व्यंगचित्र दिन आहे, त्यामुळे बाळासाहेबांची विशेष आठवण येते असंही ते म्हणाले. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "आज लोक पेटवा-पेटवीची भाषा करताहेत, आमचं संपूर्ण आयुष्य गेलं, सवाल ये नही की बस्ती मे आग कैसे लगी, सवाल ये हे की बंदर के हात माचीस किसने दी. पण माचिस देऊन पण उपयोग नाही, ती पेटायला काही तयार नाही. सर्व दारुगोळा शिवसेनेकडे आहे. शिर्डी, पंढरपूर याठिकाणी लोकांना आज काकड आरती घेता नाही आली. हजारो भाविक याला मुकले. यांच्यामुळे हिंदूंचा गळा आवळला गेला. सेनेला संपवण्यासाठी भाजपकडून सुपाऱ्या दिल्या जातात आणि त्या स्वीकारल्या जातात"


तुम्ही भोंग्यांचं राजकारण सुरु केले, जिवंतपणी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी बाळासाहेबांना जिंवतपणी यातना दिल्या ते आम्हाला बाळासाहेब सांगताहेत? असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला.


संजय राऊत पुढे म्हणाले की, "शिवाजी महाराजांचा भगवा आहे हा. बाळासाहेबांचं स्मरण केल्याशिवय दिवस उजाडत नाही. त्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवसेना उभी केली, स्वाभिमान दिला. बाळासाहेबांच्या जवळून 30 वर्ष काम करणारा मी आहे."


संजय राऊत म्हणाले की, "आयएनएस विक्रांतमध्ये एका महाशयांनी पैसे जमवायला सुरू केले. राजभवन ही भाजपची शाखा आहे, त्यांनी आम्हाला सांगितले की पैसे जमा झाले नाही. तू सच्चा होता ना मग फरार का झाला? याला त्याला जेलमध्ये पाठवणार. जेल तुझा बापाची आहे का? स्वतः शेण खायचं आणि आमच्या तोंडाचा वास घ्यायचा. मला अभिमान आहे पुणेकरांचा की महापालिका पायरीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी मनगटातील ताकद दाखवली. कार्यक्रम पुढे वाढला असता. आपण काय घाबरतो का?"


रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण मुख्यमंत्री संदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना संजय राऊत म्हणाले की, "हा महाराष्ट्र बहुजन समाजाचा आहे. छत्रपतींचा, फुले, शाहू आंबेडकरांचा, बाळासाहेब ठाकरेंचा आहे. अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कशाला विष पेरताय? या महाराष्ट्राला पहिला ब्राम्हण मुख्यमंत्री  बाळासाहेब ठाकरेंनी दिला. बॅरिस्टर अंतुले हे बाळासाहेबांचे लाडके मुख्यमंत्री होते, जे मुस्लिम होते."