Aurangabad Raj Thackeray Sabha : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबादमध्ये (Aurangabad) 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार असल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. अटी आणि शर्तींसह राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी दिली जाणार असून आज दुपारी 12 वाजेपर्यंत परवानगीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करू नये, अशी अट घालण्यात येणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मनसेच्या सभेबाबत पोलिसांचा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेच्या परवानगीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मनसे नेत्यांसह पोलीस आयुक्तांनीही माहिती दिली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अटी शर्तींसह परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काल (बुधवारी) मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सभास्थळाची पाहणी केली, तसेच पोलिसांचीही भेट घेतली होती. तर राज ठाकरे यांची औरंगाबादेत होणारी सभा ठरलेल्या वेळी, आणि ठरलेल्या दिवशीच होणार, असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. तसेच, मनसे नेते बाळा नांदगावकरांनाही सभा स्थळाची पाहणी केली. यावेळी औरंगाबादेतील मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. त्यानंतर बाळा नांदगावकर यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांचीही भेट घेतली.
राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्थी :
- ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
- लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
- इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
- व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
- सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
- वाहन पार्किंगचे नियम पाळावे
- सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
- सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
- सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये
काही दिवसांपूर्वी मनसेनं सभास्थळात बदल करावा, असं पोलिसांकडून सुचवण्यात आलं होतं. परंतु, सभा ठरलेल्या ठिकाणीच होणार असा पवित्रा मनसे नेत्यांनी घेतला आहे. तसेच, बाळासाहेबांच्या अनेक सभा याच मैदानावर झाल्या, या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे सभा स्थळात बदल करण्यात येणार नसल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलं आहे. एकीकडे औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेला अजूनही परवानगी दिली नाही. तर दुसरीकडे मात्र मनसे कार्यकर्त्यांनी सभेची तयारी सुरू केली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून औरंगाबादमध्ये जोरदार बॅनरबाजी सुरु आहे. तसेच, सभास्थळ असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर व्यासपीठ उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठाचे पुजन करून कामास सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्याविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला 3 मे रोजीचा अल्टिमेटम दिला आणि तेव्हापासूनच राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंग्यांबाबत राजकारण सुरु झालं. 3 मेच्या अल्टिमेटमपूर्वी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. असं असंलं तरी, अद्याप राज ठाकरेंच्या सभेला औरंगाबाद पोलिसांकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, औरंगाबादमध्ये 9 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचं काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.