Maharashtra Forest Guard Recruitment : वनरक्षक भरती परीक्षेतील उमेदवारांना मोबाईलवरून उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा छत्रपती संभाजी नगरच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी भांडाफोड केला आहे. शहरातील सुंदरवाडी भागातील शिवराणा करिअर अकॅडमीत छापा मारून पोलिसांनी एकाला गजाआड केले. अकॅडमी चालकासह त्याचे अन्य सहकारी मात्र फरार झाले.
औरंगाबादमध्ये ही शिवराणा करिअर अकॅडमी आहे. या अकॅडमीच्या पोलिसाच्या अटकेत असलेला विनोद डोभाळ, सचिन गोमलाडू यासह अन्य एक व्यक्ती हायटेक यंत्रणेद्वारे परीक्षार्थीला उत्तरं पुरवत होती. पोलिसांना याचा सुगावा लागताच छापा टाकण्यात आला. पोलीस असल्याची कुणकुण लागतात दोघेजण पसार झाले आणि झटापटीत विनोद डोभाळ पोलिसांच्या हाती लागला. या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
पोलिसांच्या तपासात उमेदवाराकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना मोबाईलद्वारे उत्तरे सांगितली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच उत्तरे सांगणाऱ्या चौघांना प्रत्येकी 50 हजार रुपये देणार असल्याचे समोर आले आहे .ही टोळी किती जणांना उत्तरे सांगत होती. याचा तपास पोलीस करत आहेत. गोलमाडू हा रॅकेट चालवितो. त्याशिवाय, तो शिवराणा करिअर अकॅडमीचा संचालक आहे. यातील सचिन गोमलाडू याला यापूर्वी देखील पाच ते सहा वेळा अशाच घोटाळ्यात पोलिसांनी अटक केली आहे. डमी उमेदवार बसवणे, त्याला उत्तर पुरवणे यासह अन्य गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मात्र, जामिनावर सुटताच पुन्हा त्यांनी हा धंदा सुरू केला. ही सगळी मंडळी नागपूरमध्ये बसलेल्या एका परीक्षार्थीला उत्तर देत होती. पोलीस या सगळ्या प्रकरणात वनखात्याच्या देखील संपर्कात असून हा परीक्षार्थी कोण याचाही शोध घेत आहेत.
दरम्यान, याआधीदेखील आरोग्य भरती, म्हाडा, पोलीस भरती प्रक्रियेच्या परीक्षेत घोटाळा होत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई झाली होती. त्यानंतर आता वनरक्षक भरतीचा घोटाळा समोर आल्याने परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
वनविभागात विविध संवर्गासाठी २ हजार ४१७ पदांसाठी भरती सुरू आहे. त्यात 2 हजार 138 वनरक्षकाची पदे आहेत. 31 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान परीक्षा घेण्यात येत आहे. टीसीएस ही परीक्षा घेत आहे. त्यातला 31 जुलैला परीक्षेचा पहिला दिवस असतानाच संभाजीनगरात वनरक्षक भरतीचा पेपर फुटला. मूळ वनरक्षक भरती परीक्षेचा पेपर हा नागपूर येथूनच फुटल्याचं दिसले. स्पाय कॅमेऱ्याद्वारे ही प्रश्नपत्रिका औरंगाबादमधील टोळीकडे आली. त्यांनी हायटेक कापीद्वारे परीक्षार्थीला उत्तरे सांगितली जात होती. आता नागपूरमधून पेपर फुटल्यानंतर हा प्रकार औरंगाबादमध्ये पोलिसांनी उघडकीस आणला.