Aurangabad Measles Updates: मुंबईप्रमाणेच (Mumbai News) आता औरंगाबादमध्ये (Aurangabad News) देखील गोवर रुग्णांची (Measles) वाढ झपाट्याने होताना पाहायला मिळत आहे. कारण गुरुवारी एकाच दिवसांत सात नवीन गोवर बाधितांची भर पडली आहे. तर गुरुवारी गारखेड्यातील विजयनगर, चिकलठाणा आणि नेहरूनगर या तीन भागांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. एकाच दिवसांत 7 गोवर बाधित रुग्ण पहिल्यांदाच आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी 14 संशयित रुग्ण देखील आढळले आहेत.


गोवर रुग्णांची संख्या वाढणाऱ्या शहरांमध्ये आता औरंगाबादचा समावेश झाला आहे. कारण औरंगाबाद शहरामध्ये गोवर रुग्णांची संख्या वेगाने वाढतांना पाहायला मिळत आहे. बुधवारी औरंगाबाद शहरात 6 रुग्ण वाढले होते. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी आणखी 7 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 17 वर पोहोचली आहे.


मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, "आरोग्य विभागाने 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्याची सूचना केली केली आहे. शहरात गुरुवारी सात बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गोवरबाधित बालकांमध्ये विजयनगर तीन, कैसर कॉलनी एक, बायजीपुरा एक आणि भवानी नगरमधील दोन बालकांचा समावेश आहे. तसेच अंबिकानगर, गणेश कॉलनी, नक्षत्रवाडी, नारेगाव, एन-8, चिकलठाणा, हर्सल, हर्षनगर या भागांत प्रत्येकी एक आणि बायजीपुरा आणि पुंडलिकनगर भागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे 14 बालके संशयित आढळली आहेत. सर्व संशयित रुग्णांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.


औरंगाबादकरांची चिंता वाढली!


बालकांमध्ये गोवरचं वाढतं प्रमाण औरंगाबादकरांची चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण औरंगाबाद शहरात आत्तापर्यंत 17 मुलांना गोवरची लागण झाली आहे. त्यातच संशयीतांचा आकडा 80 वर पोहचला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभागाकडून पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


लसीकरण आणि सर्वेक्षणाभर...


औरंगाबाद शहरात गोवर रुग्णांची संख्या वाढत असल्याने, औरंगाबाद महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आणि संशयित रुग्ण आढळून येत आहे त्या परिसरात मनपाच्या विशेष पथकाकडून सर्वेक्षण केले जात आहे. तसेच नवीन संशयित रुग्णांचे नमुने तात्काळ प्रयोग शाळेत पाठवण्यात येत आहे. तर दुसरीकडे औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. ज्यात 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना लसीचा अतिरिक्त डोस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्या बालकांनी डोस घेतला नाही, त्यांची यादी तयार करून त्यांचंही लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून परिश्रम घेतले जात आहे.