औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे पाचव्या वेळेस बाजी मारत इतिहास घडवणार का ही चर्चा चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. खैरे यांचं काय होणार हे शिवसेना आणि भाजपच्या युतीवरच अवलंबून असणार हे मात्र नक्की.

खैरे यांनी विजयाचा चौकार लगावला तो 1999 ते 2014 या कालावधीत. 1999 च्या निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अ.र.अंतुले यांचा पराभव केला. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील, तर 2009 च्या निवडणुकीत माजी खासदार उत्तमसिंह पवार आणि इतर उमेदवारांवर त्यांनी मात केली. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा घेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार नितीन पाटील यांचा विक्रमी मतांनी पराभव केला.

मात्र चार वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहिलं आहे. मतदारसंघात अनेक राजकीय बदल झाले आहेत. गेल्या चार निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने आघाडीच्या जागावाटपांत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मतदारसंघ मागितला आहे. 1998 चा अपवाद वगळता 1989 पासून झालेल्या आठ निवडणुकांपैकी सात निवडणुकीत कॉंग्रेसला उत्तम नेटवर्क असताना, सत्ता असताना विजय मिळवता आला नाही. चक्क माजी मुख्यमंत्र्याना पराभूत व्हावे लागले आहे. तर विलासराव देशमुख यांनी देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार बाजूला ठेवला होता.



औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीसाठी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत जोरदार चर्चा रंगत आहे. कॉंग्रेसने या मतदारसंघात सतत पराभव होत असल्याचे मान्य करत ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सोडावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. केवळ एक आमदार तसेच एकही पंचायत समिती, नगरपालिका ताब्यात नसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देऊ नये, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादी पक्षाला औरंगाबाद ही जागा सुटल्यास आमदार सतीश चव्हाण हे निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष हे पद आणि सतीश चव्हाण यांचे कधीच सूर जुळलेले नाहीत. पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य यांच्यात सतत वाद होत आलेले आहेत. ते वेळोवेळी समोर देखील आले आहेत. त्याची माध्यमातून चर्चा देखील झाली आहे.

शिवाय या मतदारसंघात काँग्रेच्या इच्छूक उमेदवारांनी मतदाराच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आमदार सुभाष झांबड, प्रा. रवींद्र बनसोड, माजी आमदार कल्याण काळे, यांच्यासह अन्य नेत्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.



शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या औरंगाबाद मतदारसंघास खिंडार पाडण्याची भारतीय जनता पक्ष देखील जय्यत तयारीत आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी खासदार जयसिंहराव गायकवाड, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यापैकी एकास भाजपची उमेदवारी मिळू शकते. मात्र युती झाल्यास ही सगळी शक्ती खासदार खैरे यांच्या पाठीशी उभा राहू शकते. सध्या तरी युतीची संकेत मिळत असल्याने नशीब पुन्हा खैरे यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे. असं असलं तरी गेल्या अनेक अडचणींना खैरे यांना सामारं जावं लागेल.

यात वेरुळ येथील संत जनार्दन स्वामी महाराज संस्थानचे महामंडलेश्‍वर शांतीगिरी महाराज हे काय भूमिका घेतात. युती झाली तरी भाजपचे कार्यकर्ते कितपत शिवसेनेला साथ देतात हेदेखील महत्त्वाचे आहे. चार वेळा खासदार राहिलेल्या खासदारा विषयी मतदारांचा मोठ्या प्रमाणार रोष आहे. चंद्रकांत खैरे यांच्याशी टोकाचे मतभेद झाल्यानंतर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेतून बाहेर पडून शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री असताना रामदास कदम आणि खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात विस्तव जात नव्हता. कदम हे पालकमंत्री असताना खासदार खैरे यांचे पक्षांतर्गत विरोधक सक्रिय झाले होते. पक्षाअतंर्गत विरोधही खैरे यांची डोकेदुखी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही

वंचित आघाडीचा काँग्रेसला फटका



भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी हातमिळवणी करत औरंगाबादेत मोठी सभा घेतली. आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेला विक्रमी गर्दी झाली होती. एमआयएम आणि भारीपबहुजन महासंघाची युती पाहता एमआयएम अजून जोशात ही निवडणुक लढवणार हे नक्की आहे. वंचित आघाडीने औरंगाबादेत माजी न्यायमूर्ती बी. जी कोळसे पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या उमेदवारीचा फटका फटका काँग्रेसला बसणार आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत औरंगाबाद शहरातील मतदारसंख्या एक लाखाने वाढली आहे. औरंगाबाद (मध्य) मतदारसंघात 28 हजार, पूर्व मतदारसंघात 38 हजार, तर पश्‍चिम मतदारसंघात 36 हजार मतदार वाढले आहेत. हे मतदार लोकसभेसाठी निर्णायक ठरणार आहेत.

मतदारसंघ

एकूण मतदार  : 17,62,298

मागील निवडणुकीत मिळालेली मते

चंद्रकांत खैरे (शिवसेना)  : 5,20,902

नितीन पाटील (काँग्रेस)  : 3,58,902

मतदारसंघातील आमदार

औरंगाबाद (पूर्व)  : अतुल सावे, भाजप

औरंगाबाद (पश्‍चिम) : संजय शिरसाट, शिवसेना

औरंगाबाद (मध्य) : इम्तियाज जलील, एमआयएम

गंगापूर : प्रशांत बंब, भाजप

वैजापूर : भाऊसाहेब चिकटगावकर, राष्ट्रवादी

कन्नड : हर्षवर्धन जाधव, शिवसेना