Aurangabad Latest Crime News Update : कर्जवसुलीसाठी बँकांनी नियुक्त केलेल्या एजन्सींचे लोक गुंडगिरी करत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. त्याचाच प्रत्यय औरंगाबादच्या स्मार्ट सिटी प्रशासनाला आला. कारण वसुली एजन्सीच्या चार गुंडांनी सोमवारी एक सिटी बस अडवून, त्यांतील प्रवाशांना चक्क खाली उतरविले. बसच्या कर्जाचे हप्ते थकल्याने आम्ही बस उचलण्यासाठी आलो आहोत, असे सांगत या गुंडांनी हा प्रकार केला. मात्र त्या बसवर कर्जचं नसल्याचे समोर आल्यावर वसुलीसाठी आलेल्या नागरिकांनी चूक झाली असे म्हणत त्यांनी माफी मागितली. मात्र याप्रकरणी आता चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, स्मार्ट सिटीची फुलंब्री-बिडकीन बस (एमएच 20 इजी 9556) सोमवारी दुपारी हर्सल टी पॉइंट येथून जात होती. त्याचवेळी चार-पाच जणांनी गाडी अडवली. तर बसमध्ये चढून त्यांनी प्रवाशांशी अरेरावी केली. तसेच त्यांना खाली उतरविले. काय घडतेय हे कुणालाच कळत नव्हते. वाहक आणि चालकाने 'तुम्ही कोण आहात आणि हे कशामुळे करताय?' अशी विचारणा केली. त्याच्या उत्तरात त्यांनी 'या गाडीवर कर्ज आहे. तिचे हप्ते थकले आहेत, त्यामुळे गाडी ताब्यात घेण्यासाठी आलो असल्याचं म्हणाले. त्यामुळे शेवटी प्रकरण पोलिसांकडे गेले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता बसवर कोणतेही कर्ज नव्हते. त्यामुळे वसुलीसाठी आलेल्या लोकांनी माफी मागत, तसं लेखी लिहून दिल्याने प्रकरण मिटले.


दोन दिवसांनी गुन्हा दाखल...


थेट महानगरपालिकेची गाडी आडवल्याने सर्वत्र या घटनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत होती. त्यामुळे अखेर प्रशासनाकडून या प्रकरणी चार लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चरण नरसिंग जाधव, राहुल रतन हिवराळे, राहुल विलयन्स वडगाळे, विवेक अशोक चव्हाण यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बस नगदी खरेदी...


विशेष म्हणजे फायनान्स एजंट असल्याचं सांगून ज्या लोकांनी सिटी बस अडवली होती, ती बस नगदीने खरेदी करण्यात आली होती. बसची नगदी खरेदी करण्यात आली होती. स्मार्ट सिटी प्रशासनाने 2018 मध्ये टाटा कंपनीकडून शंभर बसची खरेदी केली. ही खरेदी 36 कोटी रुपये देऊन रोखीने करण्यात आली होती. त्यामुळे या गाड्यांसाठी कोणतेही कर्ज घेण्यात आले नाही. परिणामी कर्जाचा हप्ता थकण्याचा विषयच नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.