औरंगाबाद : औरंगाबाद पोलिस आयुक्तांना धुरा सांभाळून दीड महिना झाला आहे. या काळात पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना वेळोवेळी शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यांना शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशही दिले. मात्र, काही मोजक्या पोलिस ठाण्यांमध्येच कारवायांचा धडाका सुरू असल्याचे दिसते. तर गुन्हेगारांचा भररस्त्यात एका तरुणीसोबत कारवर उभे राहून डान्स केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे शहरात खाकीचा वचक निर्माण करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या अपेक्षांचा भंग तर होत नाही ना असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद (रा. विशालनगर) याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी एका खून प्रकरणात त्याचा समावेश होता. 13 जुलै 2019 रोजी त्याने प्रमोद दामोदर खाडे याला रात्री साडेअकराच्या सुमारास मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक करत पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केली होती. याशिवाय विनयभंगाचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या काळात 9 ऑक्टोबर 2019 रोजी स्थानबध्दतेची कारवाई करत त्याची हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
त्यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील बराचसा भार कमी झाला होता. मात्र, तो 30 सप्टेंबर रोजी हर्सुल कारागृहातून बाहेर पडला. त्यादिवशी देखील त्याच्या स्वागतासाठी अनेक गुन्हेगारांनी हर्सुल कारागृहाबाहेर गर्दी केली होती. या गुन्हेगारांनी त्याच्यासोबत कारागृहाबाहेरच फोटोसेशन करत व्हिडीओ फेसबुकवर टाकले. कारागृहातून सुटका होताच टिप्याने पुन्हा धुडगूस घालायला सुरूवात केली आहे.
अशातील त्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामधे मध्यरात्री भररस्त्यात तरुणीसोबत तो कारवर डान्स करत सिगारेट आणि बियर पिताना दिसत आहे. यावर मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. एरवी हॉटेलात बसण्यासाठी जागा दिली. म्हणून पोलिसांकडून छापेमारी होत मद्यपींना पकडले जाते. मात्र, भररस्त्यावर धुडगूस घालणाऱ्या या गुन्हेगारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष.
गुन्हेगारांची कारागृहाबाहेर गर्दी
टिप्याची 30 सप्टेंबर रोजी हर्सुल कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी काही गुन्हेगारांनी कारागृहाबाहेरच मोठी गर्दी केली. टिप्या बाहेर पडताच या गुन्हेगारांनी घोषणाबाजी करत फोटोसेशन आणि स्वत:चे व्हिडीओ त्याच्यासोबत काढले. याशिवाय हे फोटो आणि व्हिडीओ स्वत:च्या फेसबुकवर शेअर देखील केले. अद्यापही हे व्हिडीओ फेसबुकवर आहेत.
मोजक्यांचाच कारवायांचा धडाका
पोलिस आयुक्तांकडून गुन्ह्यांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. गुन्हा घडताच तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी. अवैध धंद्यांवर पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी चाप बसवावा. गुन्हे निकाली काढावेत याशिवाय अन्य आदेश दिलेले असताना मोजक्याच पोलिस ठाण्यांच्या प्रभारींकडून कारवाया होताना दिसत आहेत. घरफोड्या, बालिकांवरील अत्याचार, वाहनचोरी, मोबाईल चोरी यासारखे अनेक गुन्हे अद्यापही उघडकीस आलेले नाहीत.