Aurangabad: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रागातून राष्ट्रवादीच्या युवक (NCP Youth Wing) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे (Bhausaheb Tarmale) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास समोर आली आहे. मात्र या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. तरमळे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी शिंदे गटाचे पदाधिकारी असल्याचं समोर आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक देखील त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत अशी लढवली होती. आता याबाबत निवडणूकचे काही बॅनरचे फोटो देखील समोर आले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी बोकुड जळगाव येथील ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती. याच निवडणुकीत राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्या मातोश्री मीराबाई तरमळे यांनी सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती. ज्यात त्यांचा विजय झाला होता. दरम्यान हाच पराभव न पचल्याने विरोधी गटातील अनिकेत नागे याने हातातील चाकुने भाऊसाहेब तरमळे यांच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केला. भाऊसाहेब यांच्या डोक्यावर, मानेवर चाकुचा मार लागला आहे. या हल्ल्यात भाऊसाहेब गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आरोपी शिंदे गटाचे!
भाऊसाहेब तरमळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. तरमळे यांच्यावर हल्ला करणारे आरोपी शिंदे गटाचे पदअधिकारी असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत मुख्य आरोपी अनिकेत नागे याची आई कविता अशोक नागे या बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर याप्रकरणी एकूण सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे आहेत आरोपी!
याप्रकरणी सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्यात अनिकेत अशोक नागे, राजु बनकर,आकाश अशोक नागे, दिनेश राठोड, अशोक रामनाथ नागे, सुनिल रुपचंद खरात, पांडुरंग भाकचंद नागे (सर्व रा. बोकुडजळगांव पैठण) असे आरोपींचे नावं आहे.
गावात पोलिसांचा बंदोबस्त
बोकुड जळगाव येथे झालेल्या राड्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत, तरमळे यांना रुग्णालयात दाखल केले. तर गावात शांततापूर्ण तणावाचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बिडकीन पोलिसांकडून गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: