Auranagabad Crime Update: औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा औरंगाबाद क्रांती चौक पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या आहेत. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक करून आणखी 3 तलवारी जप्त केल्या आहेत. 


धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले. अबरार शेख जमील उर्फ शाहरूख असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. क्रांती चौक पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर धाड टाकून 37 तलवारी आणि एक कुकरी जप्त केली होती.


यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.  


पोलीस दलही हादरले


औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सातत्याने तलवारी का येतात. कुठुन आणि कशी येतात याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या कारवाईनंतक अशी माहिती मिळाली होती की,  जालिंदर आणि अमृतसर येथून तलवारी मागवण्यात आल्या होत्या. या 37 तलवारी सात जणांच्या नावावर मागवण्यात आल्या होत्या. यातील पाच जण औरंगाबाद येथील तर दोन जण जालन्यातील आहेत. आपल्या मोबाईल वरुन सहज ऑनलाईनवरही शस्त्रे मागवता येतात. दिल्ली, अमृतसर आणि राजस्थानमधून हे शास्त्र भिवंडीच्या एका गोडाऊनमध्ये दाखल होतात आणि तिथून महाराष्ट्रभर वितरित होतात. मात्र औरंगाबाद मध्ये DTDC याच कुरियर सर्विसच्या मार्फत ही शस्त्र का आली हा देखील प्रश्न आहे. औरंगाबादच्या दंगलीनंतर 2018 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मागवण्यात आला होता. यापूर्वी जुलै 2021 मध्ये 41 तलवारी, दोन गुप्ती आणि 6 कुकरी असा शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला होता. अशा कुरियर कंपनीद्वारे शोभेच्या वस्तू म्हणून तलवारी मागवल्या जातात आणि त्यानंतर त्याला धार लावली जाते, अशीही माहिती आहे.  या तलवारी ज्याच्या नावावर आणि पत्त्यावर मागवण्यात आल्या, त्या व्यक्तीचे नाव आणि पत्तेही अर्धवट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.  त्यामुळे या तलवारी कोणत्या उद्देशासाठी मागवल्या होत्या हे  शोधणं पोलिसांसमोर आव्हान आहे.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha