औरंगाबाद : मराठवाड्यात सुरु असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवीचा प्रकार आहे की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कृत्रिम पावसाबाबत 8 ऑगस्टला विभागीय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची सगळी तयारी पुर्ण झाली असल्याचं सांगितलं. कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान आलं असून आता प्रयोगाला सुरुवात करत आहोत अशी माहिती यावेळी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान अजूनही सौदी अरेबियातच असल्याचं आता पुढं आल आहे.

कृत्रिम पावसासाठी जी समिती तयार करण्यात आली होती त्यांनी 8 ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत सगळी तयारी पुर्ण झाली असून लवकरच सुरुवात करण्यार असल्याचं सांगितलं होतं. मात्र हे सगळं खोटं असल्याचं आता पुढं आलं आहे. ती प्रयोगाची सुरुवात नव्हती तर फक्त चाचणी असल्याचंही समोर आलं आहे. कृत्रिम पावसासाठी डॉपलर रडार बसलं हे सत्य आहे मात्र यासाठी महत्वाचं असणारं सी 90 विमान अद्यापही औरंगाबादमध्ये नाही तर भारतातच आलेलं नाही. अमेरिकेहून निघाल्यावर हे विमान आता सौदी अरेबियात अडकलं आहे. हे विमान यायला किमान अजून आठवडा लागणार आहे. त्यामुळंच उशीर झालेला असल्यानं प्रशासनानं सोलापूरला असलेलं आयआयटीएमचं विमान मागवलं आणि प्रयोगाला सुरुवात झाल्याचा बनाव केला. दोन दिवस हे विमान औरंगाबादला थांबलं सुद्धा आणि आता ते सोलापूरला परत सुद्धा गेलं आहे.

राज्य शासनाने ज्या केसीएमसी कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीचे विमान अमेरिकेहून सौदी अरेबियात दाखल झाले आहे. त्याठिकाणी सध्या विमानातील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे, तपासणीचे काम सुरू आहे. 17 तारखेला ते विमान भारतात दाखल होईल. अहमदाबादमध्ये कस्टम विभागाच्या प्रक्रिया पूर्ण करून 18 तारखेला विमान औरंगाबाद विमानतळावर प्रयोगासाठी सज्ज असेल, असं आता सांगण्यात येत आहे.

त्यामुळं राज्य शासनाकडून कृत्रिम पावसाची तारीख पाळण्यासाठी ही दिखावेगिरी केली जात असल्याची चर्चा आता आहे. या गोंधळात कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी ठेवलेले 31 कोटी पाण्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यात हे सगळं झाकण्यासाठी प्रशासनाची ही बनवाबनवी सुरु आहे का? असा प्रश्न पडत आहे.

मराठवाड्यात पाऊस का पडत नाही? | स्पेशल रिपोर्ट