औरंगाबाद : कोरोनाबाधित रूग्णांची जलदगतीने माहिती मिळावी यासाठी आता ‘अँटिजन टेस्ट’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 10 ते 18 जुलै दरम्यान पुकारलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर त्याच्या परिसरातील नागरिकांची या पद्धतीद्वारे चाचणी घेण्यात येईल. याशिवाय शहरात येणाऱ्यांनाही ही चाचणी करूनच प्रवेश देण्यात येणार आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे़ रूग्ण आढळल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन म्हणजे संस्थात्मक विलगीकरण करून लाळेचे नमुने (स्वॅब) घेण्यात येतात. नमुने घेतल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत 24 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. तोपर्यंत रूग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो. यावर पर्याय म्हणून ‘अँटिजन टेस्ट'चा पर्याय समोर आला आहे. त्याचाच वापर करून कोरोनाबाधितांना शोधण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. 10 ते 18 जुलै दरम्यान होणाऱ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ‘अँटिजन टेस्ट करण्यात येणार असून यासाठी 17 टास्क फोर्स सज्ज करण्यात आले आहे. शहरात जिथे जिथे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येईल, तेथील 500 मीटरच्या अंतरावरील नागरीकांची ‘अँटिजन टेस्ट’ करण्यात येईल. अवघ्या अर्धा ते एक तासामध्ये टेस्टचा रिपोर्ट प्राप्त होणार असल्याने बाधित रूग्णांवर वेळीच उपचार होणार आहे.



अशी होते अँटिजन टेस्ट
अँटिजन टेस्टमध्ये  रुग्णांच्या नाकातून नमुने घेतले जातात. एका छोट्या मशीन द्वारे त्याची तपासणी शक्य आहे. ज्या किटवर तपासणी होते. त्यावर दोन लाल रेषा दिसून आल्यास रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं जातं. किटवर एकच लाल रेषा आली असेल तर रुग्ण निगेटिव्ह असल्याचं सांगितलं जातं.

प्रवाशांचीही होणार तपासणी
शहरामध्ये दररोज 700 ते 800 नागरिक अन्य जिल्ह्यातून येतात. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांद्वारे कोरोना शिरकाव होण्याची शक्यता आहे. हा प्रकार घडू नये यासाठी प्रवाशांचीही ‘अँटिजन टेस्ट’ करण्यात येईल. रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश देण्यात येणार आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर अशा व्यक्तीस तत्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारादासाठी दाखल करण्यात येईल. यासाठी शहराच्या सीमेवरती चार टीम सज्ज नियुक्त करण्यात आल्या आहेत.

घरच्या घरी होणार तपासणी
कोरोनाबाधित रूग्णांवर प्रथम उपचार होणे आवश्यक आहेत. ‘अँटिजन टेस्ट’द्वारे तासाभरामध्ये रिपोर्ट प्राप्त होणार आहे. नागरिकांची टेस्ट घेण्यासाठी मनपाने 17 टास्क फोर्स तयार केले आहे. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन टास्क फोर्सची टीम तपासणी करतील. बाधित रूग्ण आढळल्यास त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात येईल. ‘अँटिजन टेस्ट’मुळे नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्याची गरज पडणार नाही. घरच्या घरी राहूनच त्यांना चाचणी करता येणार आहे.



आयुक्तांच्या दालनात झाली ट्रायल
लॉकडाऊनच्या काळामध्ये होणाऱ्या 'अँटिजन टेस्ट' ची ट्रायल मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्या दालनात बुधवारी करण्यात आली. यात चार कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर टेस्ट करण्यात आली. आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांची उपस्थिती होती.