परभणी:  दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्यातील पशूपालकापुढं अॅथ्रॅक्स नावाचं नवं संकट उभ राहिलं आहे. परभणीतील भारस्वाडा गावातील मेंढ्याना अॅथ्रॅक्स रोगाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या रोगामुळं आतापर्यंत परिसरातील 100 पेक्षा जास्त मेंढ्या दगावल्या आहेत. तर अजूनही अनेक मेंढ्यांना या रोगाची लागण झाल्याचा संशय पशू वैद्यकांना आहे.


 

भारस्वाड गावात 15 कुटुंब मेंढी पालनाचा व्यवसाय करतात. महिनाभरापूर्वी यातील काही मेंढ्या अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळू लागल्या. काही उपचार करायच्या आतच त्या मरणही पावल्या. रोगाची कोणतीही लक्षणं दिसायच्या आतच मेंढ्या जीव सोडत असल्यानं पशूपालकही घाबरले. त्यांनी तातडीने कृषी विद्यापीठातील पशूवैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क केला.

 

यानंतर महाविद्यालयाने मेंढ्यांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या शासकीय रोग निदान प्रयोग शाळेकडे पाठवले. रक्ताच्या विविध चाचण्या केल्यानंतर हा अॅथ्रॅक्स रोग असल्याचं राज्य रोग निदान प्रयोगशाळेतर्फे सांगण्यात आलं.



रवंथ करणाऱ्या जनावरांना अॅथ्रॅक्सची लागण

गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी रवंथ करणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा जीवाणू स्वत: भोवती कवच करून 71 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो.

 

अॅथ्रॅक्सची लक्षणं

* जनावरांना ताप येतो

*जनावरांचं संपूर्ण शरीर थरथरते

*जनावर जमिनीवर पडून तडफडते

*त्यांना श्वसनाचा त्रास होतो

*जनावराचे पोट फुगते आणि त्यांचा तत्काळ मृत्यू होतो

 

माणसांनाही धोका?

या रोगाची माणसांना क्वचितच लागण होते. अॅथ्रॅक्सचा जीवाणू त्त्वचेवरील जखमेद्वारे, श्वसनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास पोटाचा अॅथ्रॅक्स होऊ शकतो.

 

उपाय

पशूपालकांनी कायम शरीरभर कपडे घालावे, तोंड आणि नाकावर कायम मास्क वापरावा, अॅथ्रॅक्सग्रस्त मृत जनावराची विल्हेवाट लावताना विशेष काळजी घ्यावी. मृत जनावराची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्यांची नैसर्गिक छिद्र जंतूनाशकाच्या बोळ्यानं बंद करावीत. आजारी जनावरांचे मासं खाऊ नये. आजारी जनावरांना त्वरित लसीकरण करावं.



भारस्वाडा गावातील जनावरांसाठी बंगळुरुहून लस मागवण्यात आली आहे. या सगळ्या जनावरांना लसीकरण करण्यात येईल. कुठंही या रोगाची लक्षणं दिसल्यास पशूपालकांनी खासगी पशूवैद्यकाकडं उपचार न करता पशूसंवर्धन विभागाला याची माहीती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.