Amravati News: अमरावतीत विभागीय आयुक्तालयाबाहेर पांढरी खानमपूर इथल्या आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरुन जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.


दरम्यान, आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले असून 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. काही जखमींवर खाजगी तर काही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 25 हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


नेमकं काय घडलं? 


अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून अमरावती जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापलं असून विभागीय आयुक्त कार्यालयावर काल गावकरी आणि पोलिसांमध्ये राडा झाला. हिसंक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर जमावाकडून पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. यावेळी पोलिसांच्या आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावानं केलेल्या दगडफेकीत 27 पोलीस कर्मचारी, अधिकारी जखमी झाले असून अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. 25 पेक्षा जास्त आंदोलन कर्त्यांवर दंगलीचे आणि शासकीय मालमत्तेची नाद्धुस केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.