अमरावती : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात शासकीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला शासकीय अधिकारीचं गैरहजर राहिल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, बैठकीसाठी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याही संतापाला सामोरं जावं लागलं.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात शासकीय विश्राम गृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकारी तसेच इतर संबंधित अधिकारी या बैठकीला गैरहजर राहल्याने ही बैठक होऊ शकली नाही.
शासकीय बैठकीला अधिकारी गैरहजर
यावेळी विश्रामगृहच्या ठिकाणी एकटे उपजिल्हाधिकारी हे आले असता त्यांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. आमदार यशोमती ठाकूर यांनीही अधिकाऱ्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, "तुम्ही त्यांना मिटिंग संदर्भात बोलावून घ्या", अशा कडक सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आणि काँग्रेस भवनकडे निघून गेले.
दहा महिन्यात सरकार बदलणार : वडेट्टीवार
यावेळी काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांना अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत हा प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, अधिकाऱ्यांनी येणं अपेक्षित होतं, पण ते आले नाही. एक त्यांनी लक्षात ठेवावे की "माझं नाव वडेट्टीवार आहे", असं बोलून अधिकाऱ्यांना इशारा त्यांनी दिला. सगळे अधिकारी घाबरून आहे, त्यामुळे आले नाही, सरकार बदलत असतं, हे त्यांनी विसरू नये. दहा महिन्यात सरकार बदलणार आहे असेही वडेट्टीवार म्हणाले.
पवारांच्या बोलण्याचा नेमका अर्थ सांगता येणार नाही : वडेट्टीवार
दरम्यान, सध्या राष्ट्रवारी पक्षात फूट पडली की नाही हा विषय सध्या चर्चेत आहे. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, "शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? हे सांगता येणार नाही. उद्या त्यांच्या पक्षाच्या फुटीचं प्रकरण निवडणूक आयोगात जाईल, कोर्टात जाईल. त्यामुळे तो त्यांच्या रणनितीचा भाग असू शकतो. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही, हे जाहीररीत्या सांगावं", असं वडेट्टीवार म्हणाले. "प्रत्येक पक्षाला आपापल्या परीनं तयारी करावी लागते. निवडणुकीमध्ये असे प्रसंग येतात की, शेवटच्या टप्प्यामध्ये आघाडी तुटते. त्यासाठी प्रत्येक पक्षाला रणनिती तयार ठेवावी लागते.", असं वक्तव्यही वडेट्टीवार यांनी केलं आहे.