अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्यात आज अमरावती येथे भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळ-जवळ 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. शरद पवार हे सध्या दोन दिवसांच्या अमरावती (Amravati) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावर आज गुरुवारी शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडूच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीचे आमंत्रण दिल्यापासून चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर आता बंद दाराआड झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला जोर मिळाला आहे.
बच्चू कडू काय म्हणाले ?
आज घडीला कुठल्याही राजकीय नेत्यांची भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही. त्यातच आता प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेमुळे आगामी काळात बच्चू कडू काय भूमिका घेतील हे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, एकीकडे या चर्चा रंगत असतांना या चर्चाना स्वतः बच्चू कडू यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. मात्र या भेटी दरम्यान सर्वाधिक चर्चा ही शेतीवर झाली. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे ही रोजगार हमी योजनेत व्हायला हवेत. ही बाब तुमच्या अजेंड्या मध्ये असायला हवी, असे मी त्यांना सुचवले, असल्याचं बच्चू कडू म्हणाले.
आकाशात ढगचं आले नाही, ढग येउद्या मग बघू - बच्चू कडू
या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झाल्याचे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, मात्र समजा जर ती, झाली असेल तरी तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अजून आकाशात ढगच आले नाही, ढग येउद्या मग पाहू, अशा मिश्किल शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया देत या भेटीतील गुप्तता पाळली.
भेटी बाबत शरद पवार काय म्हणाले ?
सध्या मी दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर असल्याचे बच्चू कडू यांना माहिती होताच त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. “मी बच्चू कडूंच्या घरी जातोय, त्यात काहीही राजकीय हेतू नाही. एका विधानसभेच्या सदस्यानं चहासाठी बोलावलं, तर एवढी चर्चा करण्याची गरज नाही.” असं सांगत शरद पवारांनी राजकीय शक्यतांना पूर्णविराम दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :