Sambhaji Bhide Controversy : दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर अखेर आज अमरावतीच्या (Amravati) राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधीं बद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काल विधिमंडळासह राज्यभरातील विविध ठिकाणी आज आंदोलन करत संभाजी भिडे यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. आता अखेर अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करणे 153 कलम अंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

Continues below advertisement


संभाजी भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हा दाखल


संभाजी भिडे हे अनेकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेत असतात. बडनेरा मार्गावरील सातूरनामधील जय भारत मंगल कार्यालयात संभाजी भिडे यांचे 27 जुलै गुरुवारी सायंकाळी व्याख्यान होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. गांधी यांचे वडील मुसलमान होते, असा अजब दावा संभाजी भिडेंनी केला. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भिडेंवर कठोर कारवाईची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. 


महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाचे पडसाद


संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मी आणि भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कार्यक्रमस्थळी भिडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संभाजी भिडे यांच्या जाहीर व्याख्यानात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी भिडे यांचा बोलवता धनी कोण असा प्रश्न केला. महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानाचा काँग्रेसनी शुक्रवारी जाहीर निषेध नोंदविला.


संभाजी भिडे विरोधात अमरावतीत काँग्रेसचं आंदोलन


दोन दिवसाआधी अमरावतीमध्ये शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये महात्मा गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर याचे पडसाद विधानसभेत सुद्धा उमटलेले पाहायला मिळाले. आज अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आक्रमक होत आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. 


संभाजी भिडेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : यशोमती ठाकूर 


संभाजी भिडे यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 'संभाजी भिडे यांना संभाजी महाराजांचं नाव वापरण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहे ते महात्मा गांधींचा अपमान कसं काय सहन करतात? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेर देशात जाऊन महात्मा गांधी समोर नतमस्तक होतात, नाटक करतात आणि इथे संभाजी भिडे यांना अभय देतात याचा आम्ही निषेध करतो,' अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली, यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजीमंत्री सुनील देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.