अमरावती : 'जितकं सरकारने दिलं नाही तितकं बैलांनी दिलं', अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एबीपी माझाशी बोलतांना केलं आहे. संपूर्ण राज्यभरात गुरुवारी महाराष्ट्रीय बेंदूर सणाचा उत्साह पाहायला मिळाला. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील अमरावतीतील (Amravati) बेलोरा या त्यांच्या मूळ गावी जाऊन बेंदूर हा सण साजरा केला. यावेळी बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी बैलजोडीची विधीवत पूजा देखील केली.
काय म्हणाले बच्चू कडू?
प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी यावेळी बोलतांना म्हटलं की, 'आधी सगळ्या गोष्टी या गाव खेड्यातून होत होत्या. पण आता या सर्व गोष्टींवर मागील 50 ते 70 वर्षांपासून दरोडा टाकण्यात आला आहे. शेती ही शेतकऱ्यांसाठी नाही राहिली ती आता उद्योगपतींची झाली आहे. बैलाने शेतकऱ्यांना खूप काही दिलं आहे. सध्याच्या यंत्राच्या युगामुळे बैलाचं काम खूप हलकं केलं आहे.'
सगळ्यात मोठा व्यवहार हा शेतीचा
'सध्या जे काही होतं ते उद्योगपतींच्या मार्फत होतं. शेतीसाठी लागणारं बियाणं देखील उद्योगपतींकडून येतं. ट्रॅक्टर वैगरे पण आता उद्योगपतींच्या घरुन येतं. इतकचं काय तर औषधही उद्योगपतींच्या घरुन येतात आणि पुन्हा हे सगळं उद्योगपतींच्याच हातात जातं. हल्ली संपूर्ण शेती ही उद्योगपतींच्या हातात गेली असून शेतकऱ्यांसाठी शेती राहिलीच नाही. सर्वात मोठा व्यवहार हा शेतमालाचा होता. जगातिक पातळीवर देखील शेतमालाचा व्यवहार हा सर्वात जास्त होतो', असं बच्चू कडू म्हणाले.
सरकार कमी पडलं
सध्या संपूर्ण व्यवहार हा उद्योगपतींकडे गेला असून शेतकऱ्यांकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सगळं निसटून चालंलय. पण यावर उद्योगपती मात्र खूप आनंदीत झालाय. शेतकऱ्यांचं जे होते ते उद्योगपतींच्या हातात गेलं. नफ्यात येणार शेतकरी यामुळे तोट्यात गेला, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. यामध्ये सरकार देखील कमी पडलं असल्याचा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे. तर शेतकऱ्यांची होणारी लूट कधी कमी होणार हा प्रश्न देखील बच्च कडू यांनी उपस्थित केला होता.
राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह
गुरुवार (14 सप्टेंबर) रोजी संपूर्ण राज्यभरात बैळपोळ्याचा उत्साहात साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण फार महत्त्वाचा असतो. आजचा सण हा बळीराजा आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बैलासाठी साजरा करण्यात येतो. वर्षभर बळीराज्यासाठी राबणाऱ्या बैलाची संपूर्ण शेतकरी कुटुंब आजच्या दिवशी मनोभावे पूजा करतात.