Amravati News : महिला पुरुषांपेक्षा कशातच कमी नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. अमरावतीच्या (Amravati) तळेगाव दशासरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शंकरपटात यंदा महिलांनीही सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं. शिक्षणाचा गाडा हाकणाऱ्या एका तरुणीने या स्पर्धेत बाजी मारली आहे.
अमरावतीच्या तळेगाव दशासर येथील महिलांचा शंकरपटाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी या शंकरपटात एक उच्चशिक्षित युवतीने सहभाग घेतला. सर्वात कमी वेळात तिने आपली बैलजोडी पळवली. विशेष म्हणजे ही तरुणी UPSC ची तयारी करत आहे.
शंकरपटात उन्नतीने अवघ्या 13 सेकंदात पल्ला गाठला
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे 15 तारखेपासून चार दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला होता. रविवारी दो-दाणी, सोमवार आणि मंगळवारी एकदानी आणि बुधवारी महिलांचा शंकरपट झाला. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वात आधी याच तळेगाव दशासरच्या शंकरपटात महिलांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या शंकरपटाला मोठी गर्दी असते. बुधवारी (18 जानेवारी) झालेल्या शंकरपटात उन्नती लोया या तरुणीने सहभाग घेतला आणि अवघ्या 13 सेकंदात तिने आपला पल्ला गाठला.
उन्नती ही मूळची तळेगाव दशासर गावाचीच आहे. तिचे वडील हे शेतकरी आहेत. सर्वसामान्य कुटुंबात उन्नती मोठी झाली. सध्या ती नागपुरात UPSC ची तयारी करत आहे. आई-वडिलांची इच्छा होती की, आमची उन्नतीने तळेगावच्या शंकरपटात सहभाग घ्यावा. बुधवारी उन्नतीने सहभाग घेतला. शंकरपटात बैलजोडी घेऊन धावणे म्हणजे मोठा जिगर लागतो ते माझ्या मुलीमध्ये आहे असा विश्वास उन्नतीच्या आई-वडिलांनी सांगितले.
कँडीक्रश आणि पब्जी अशा खेळांमध्ये सध्याची पिढी अडकल्याचं दिसते. मात्र गावखेड्यात अजूनही पारंपारिक खेळ जपले जातात आणि आवडीने खेळले देखील जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जुन्या खेळांची ही परंपरा आजची पिढीही तितक्याच आपुलकीने जपत आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून शंकरपटाला सुरुवात
शेकडो वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाद्वारे शंकरपट आयोजित केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील शंकरपटाला सुरुवात झाली. 20 एकर जागेत हा पट आणि यात्रा भरते. गावाकऱ्यांसाठी शंकरपट आणि यात्रा हा मोठा उत्सव म्हणून यावर्षी आयोजित करण्यात आला आहे. शंकरपट पाहण्याकरता पंचक्रोषीतून लोक येत असतात त्यामुळे येथील व्यवसायाला चालना देखील मिळते. या शंकरपटात सुसाट वेगाने पळणारी रिंगी वजनाने अत्यंत हलकी असते. शर्यतीच्या धावपट्टीच्या बाजूने विशिष्ट अंतरावर दोन खांब असतात आणि त्याला धागा बांधलेला असतो. पहिला धागा तोडला की घड्याळ सुरु होते, दुसरा धागा तोडला की घड्याळ बंद पडते. त्या दोन धाग्यांमधून धावतानाच्या नेमक्या वेगाची या घड्याळात नोंद होते. जी जोडी कमी वेळात अंतर कापेल ती विजयी ठरते. या शंकरपटासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बैलजोड्या आणून या स्पर्धेत खेळवल्या जातात. तळेगाव दशासर येथील प्रसिद्ध असलेला शंकरपटाला 15 जानेवारीपासून सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी दो दाणी शंकरपट, सोमवार आणि मंगळवारला एकदाणी स्पर्धेचे तसेच 18 जानेवारीला महिलांसाठी शंकरपटचं आयोजन करण्यात आले होतं, जे सर्वांसाठी मोठे आकर्षण होतं.