अमरावती : महानुभाव संप्रदायाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीमधील रिद्धपूर नगरीत आषाढीनिमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पाऊस पडत असतानाही यावेळी लाखो भाविकांनी प्रसाद वंदनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थिती लावली. गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यात्रा झाल्या नव्हत्या. त्यामुळे यावर्षी मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं.


दरवर्षी आषाढीनिमित्त श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंद प्रभू यांच्या वस्त्रपूजेसाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थिती लावतात. रिद्धपूर हे ठिकाण श्री गोविंद प्रभू यांची कर्मभूमी आहे. या परिससात जवळपास 300 मंदिरे आहेत. त्यामुळेच या नगरीला महानुभाव संप्रदायाची काशी असं म्हटलं जातं. आषाढीनिमित्त श्री गोविंद प्रभी यांच्याशी संबंधित गोष्टी या वंदनासाठी ठेवल्या जातात. त्यामुळेच यादिवशी प्रसाद वंदनासाठी लाखो भाविकांची गर्दी याठिकाणी असते. विशेषत: गवळी समाजासाठी हे ठिकाण पवित्र असून हजारो भक्त आजच्या दिवशी या ठिकाणी दर्शनासाठी येतात. 


महानुभाव संप्रदायाचे साहित्याला योगदान
मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला.म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30 हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे. 


आषाढीनिमित्त रिद्धपूरमध्ये मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक येतात आणि यात्रेचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. यंदा मोठी गर्दी झाल्याचं पहायला मिळालं. या वेळची होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गेल्या तीन दिवसांपासून रिद्धपूरमध्ये भाविकांची गर्दी आहे. या गर्दीचे योग्य नियोजन पोलीस प्रशासनाने केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: