अमरावती: शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड इरफान खान हा राणा दाम्पत्यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. ज्या ठिकाणी अशा घटना होत आहेत त्या ठिकाणी भाजपची लिंक समोर येत असल्याचा आर


अमरावती खासदारांचा 27 तारखेचं पत्र आणि 28 ला उदयपुरची घटना हे खूप गंभीर बाब असून याची चौकशी झाली पाहीजे असं ही यशोमती ठाकूर म्हणाल्या. अमरावती आणि उदयपूरची घटना ही पूर्वनियोजित आहे, राणा दाम्पत्यांनी काल-परवा हनुमान चालीसा वाचली, किती गडूळ करणार अमरावती असंही त्या म्हणाल्या. भाजप जर अमरावती प्रयोगशाळा करत असतील तर आम्ही हे कदापी होऊ देणार नाही असं त्या म्हणाल्या.


कोल्हे हत्येचा मुख्य सूत्रधार हा काँग्रेसचा कार्यकर्ता: आ.रवी राणा
आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी तो आरोपी आमचा नसून काँग्रेसचा सदस्य असल्याचा पलटवार केला.


आमदार रवी राणा म्हणाले की, "21 जूनला उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि 2 जुलै पर्यंत पोलीस रॉबरीचा तपास करत होती, तेही यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह तपास करत होत्या. पण जेव्हा NIA ची टीम अमरावतीत आली तेव्हा उमेश कोल्हे यांची हत्या कशाने झाले हे उघड होते. यशोमती ठाकूर या लपून छपून उमेश कोल्हे यांच्या घरी जातात, कारण मुस्लिम व्होट बँक कमी होऊ नये म्हणून." 


आरोपी इरफान खान हा काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याने सदस्य फॉर्म सुद्धा भरलेला आहे. सोबतच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या बॅनर खाली पण तो दिसला आहे असं आमदार रवी राणा म्हणाले. 27 तारखेच्या पत्रावर आमदार रवी राणा म्हणाले की, ती टाईपिंग मिस्टेक होती. अवघ्या 10 मिनिटात ती दुरुस्ती करून आम्ही 29 तारीख करून पाठवली. 


खासदार बोंडेंचाही आरोप
आज माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन उदयपूर आणि अमरावती सारख्या घडणाऱ्या घटनेत भाजपचाच हात असल्याचा आरोप केला. त्यावर खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावरच गंभीर आरोप लावले. खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, "यशोमती ताई सध्या पश्चातापामध्ये आहेत. त्यांना माहिती असेल की, 12 नोव्हेंबरला 40 हजार मुस्लिमांचा मोर्चा झाला, तेव्हा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फक्त 40 पोलीस ठेवले. त्याच मोर्चातील लोक लूटमार करतात, मारहाण करतात, तेव्हा काय शोध घेतला, कोणत्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा हात होता तेही सांगितलं पाहिजे." जो कोणी माणूस हिंदूंची कत्तल करत असेल त्याला फासावर लटकवलंच पाहीजे असंही खासदार डॉ. अनिल बोंडे म्हणाले.


खासदार अनिल बोंडे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. उमेश कोल्हे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेला इरफान याला मध्यप्रदेश मधील इंदोर पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात 19 दिवसांची तुरुंगवारी घडवल्याचा आरोप भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला.


एका विवाहित महिलेला इरफान याच्या मित्राने आणि इरफानने पळवून आणले आणि तिला जबरदस्तीने बुरखा घालून घरी डांबून ठेवले, तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. अमरावती शहरात बांगलादेशी नागरिक असून इतर ही लोकं इथे वास्तव्यास आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी आणि शहरातील अतिक्रमण काढावे अशी मागणीही त्यांनी केली.