Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्याचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे, असं प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी म्हटलं. अमरावतीमधील (Amravati) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) हालचाली वेगाने घडत आहेत. बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार लवकर करण्याची मागणी वेळोवेळी केली होती.  त्यातच अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यामुळे आधीपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत असणाऱ्या आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. तर बदलत्या राजकारणाला कंटाळून मंत्रिपदाचा दावा सोडणार असल्याचं बच्चू कडू म्हटलं होतं. आजच्या पत्रकार परिषदेत ते याबाबत घोषणा करणार होते. परंतु मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केल्याने सध्या हा निर्णय मागे घेत आहे, असं बच्चू कडू म्हणाले.


...तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती


बच्चू कडू म्हणाले की, "मला महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्याने मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. आम्हाला अनेकवेळा अनेकांनी आमिष दिले तरीही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो. उद्धव ठाकरे यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं असतं तर गुवाहाटीला जाण्याची वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले त्यामुळे आम्ही आयुष्यभर त्यांचे गुलाम राहू. मी मंत्रिपदाचा दावा सोडण्याचा निर्णय घेणार होतो पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर मी माझा निर्णय घेणार आहे. मी 17 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटून मग 18 तारखेला माझा निर्णय जाहीर करणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे सध्या निर्णय मागे


मुख्यमंत्र्यांनी फार विनंती केली म्हणून मी सध्या निर्णय मागे घेत आहे. काम,पद, हे तर येत राहिल. पण विश्वास जर का गेला तर तो परत येत नाही. आम्ही सामान्यांसाठी लढू शकतो, मरु शकतो पण चापलुसी करु शकत नाही. पद घेण्यापेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे. मुख्यमंत्री पेचात असताना त्यांना मदत करण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हाला अजित दादा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीच लेनदेन नाही, असं बच्चू कडू म्हणाले.


हेही वाचा


शरद पवार गटासोबतची कायदेशीर लढाई, खातेवाटप अन् मंत्रिमंडळ विस्तार; अजित पवार, अमित शाह बैठकीची इन्साईड स्टोरी