Amravati Graduate Constituency election: अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुक 30 जानेवारीला होत आहे. या निवडणुकीत भाजपचे डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा निवडणुक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांच्याशी त्यांचा सामना आहे. मात्र, पक्षांतर्गत नाराजी, महाविकास आघाडीचा उमेदवार, पक्षातीलच एका कार्यकर्त्याची बंडखोरी अशा आव्हानांचा डोंगर डॉ. रणजीत पाटलांसमोर आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघाचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट...  


अमरावती पदवीधर मतदारसंघ... कधीकाळी अभ्यासू आमदार प्रा. बी.टी. देशमुखांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ. बीटी तब्बल सहावेळा येथून विजयी झालेले. मात्र, 2010 मध्ये भाजपाचे रणजीत पाटील बीटींना हरवत 'जायंट किलर' ठरलेत. 2010 आणि 2016 अशा सलग दोन टर्म रणजीत पाटलांनी येथील मैदान मारलं. या दोन टर्ममध्ये आमदार आणि अनेक खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी सभागृह आणि सभागृहाबाहेर 'अभ्यासू' अशी छाप पाडलीय. मात्र, तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या रणजीत पाटलांसमोर मोठी आव्हानं आहेत. अमरावतीची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला आली. काँग्रेसकडून येथील उमेदवारीवरून मोठा घोळ घालण्यात आला. पक्षात चार-पाच ईच्छूक असतांना काँग्रेसनं ऐनवेळी ठाकरे गटाच्या धीरज लिंगाडेंना उमेदवारीसाठी आयात केलं. त्यामूळे लिंगाडेंच्या उमेदवारीवरून मविआतच समन्यवाचं मोठं आव्हान असण्याची शक्यता आहे. 


डॉ. रणजीत पाटलांसमोर प्रमुख आव्हान असलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरण सरनाईकांचे बंधू अरूण सरनाईक रिंगणात आहे. यासोबतच डॉ. पाटलांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शरद झांबरे यांनी त्यांच्याविरोधातच शड्डू ठोकलेय. भाजपाच्या नाराजांचा पाठींबा मिळण्याची अपेक्षा झांबरेंना आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्षांनी डॉ. रणजीत पाटीलच विजयी होणार दावा केला आहे. 


अमरावती पदवीधर मतदारसंघ एक दृष्टीक्षेप :



  • मतदारसंघातील जिल्हे : 05 : अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ

  • एकूण उमेदवार : 23

  • एकूण मतदार : 2 लाख 6 हजार 172

  • प्रमुख उमेदवार : डॉ. रणजीत पाटील (भाजप), धीरज लिंगाडे (काँग्रेस), प्रा. अनिल अंमलकार (वंचित), शरद झांबरे (भाजप बंडखोर) 


डॉ. रणजीत पाटलांच्या 'हॅट्ट्रीक'च्या वाटेवार आव्हानांचे काटे : 


राज्यातील पाचपैकी अमरावती पदवीधर मतदारसंघ भाजपसाठी मोठ्या प्रतिष्ठेचा झाला आहे. कारण, या ठिकाणी भाजपचे डॉ. रणजीत पाटील तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत. राज्याच्या राजकारणात डॉ. रणजीत पाटलांची ओळख ही देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू अशी. कारण, फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्याकडे असलेल्या डझनभर खात्यांचे डॉ. रणजीत पाटील हे राज्यमंत्री होते. 12  जानेवारीला डॉ. रणजीत पाटील यांचा अर्ज भरायला खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत उपस्थित होते. त्यामूळे अमरावतीत डॉ. रणजीत पाटील उमेदवार असले तरी खरी प्रतिष्ठा पणाला लागली आहे ती देवेंद्र फडणवीस यांचीच. मात्र, 2010 मध्ये प्रस्थापितांविरोधात 'परिवर्तना'चा 'कौल' मागणारे रणजीत पाटीलच आता प्रस्थापित झाले आहेत. त्याच परिवर्तनाच्या लाटेवर 'जायंट किलर' ठरलेल्या डॉ. पाटलांसोबत त्यांच्याचसंदर्भातील इतिहासाची पुनरावृत्ती होईल का?, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण, यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. 


रणजीत पाटलांनी रोजगार मेळावे, शाळांना संगणक, प्रिटर्स वाटपातून मोठा विकास केल्याचा दावा प्रचारादरम्यान केला आहे. मात्र, 'शॅडो सीएम' राहिलेल्या डॉ. रणजीत पाटलांना सहा वर्षात एव्हढाच विकास साधता आला का?, असे प्रश्न विरोधक आता विचारत आहेत?. 


काँग्रेसनं घातलेल्या उमेदवारीच्या 'घोळा'ने पक्षात नाराजी! :


खरंतर यावेळी आठवड्याभरापूर्वीपर्यंत डॉ. रणजीत पाटील यांच्याविरोधात कोण उमेदवार असेल यावर विरोधी पक्षांचं एकमत होत नव्हतं. काँग्रेसकडून अकोल्याचे डॉ.सुधीर ढोणे आणि अमरावतीचे मिलिंद चिमटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र एनवेळी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे बुलढाण्यातील नेते धीरज लिंगाडे यांना ऐनवेळी काँग्रेसची उमेदवारी देत 'एबी फॉर्म' दिला. काँग्रेसमधील या उमेदवारीच्या गोंधळानं अमरावती जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मोठी नाराजी आहेय. बुलडाण्याच्या धिरज लिंगाडेंना पाचही जिल्ह्यात नेते आणि मतदारांशी संपर्क करतांना अक्षरश: नाकीनऊ येत आहेत. 


वंचितची उमेदवारी कुणाच्या पथ्यावर : 


वंचित बहूजन आघाडीची उमेदवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगावचे प्रा. अनिल अंमलकार यांना दिली. पाचही जिल्ह्यात वंचितची 'कमिटेड' मतं आहेत. ही मतं त्यांना मिळू शकतात. मात्र, आंबेडकरांना मानणारा ओबीसी आणि इतर मायक्रो मायनॉरिटीची मतं त्यांच्या उमेदवारांना मिळणार का?, हा प्रश्न आहे. अंमलकार यांना मिळालेली मंतं नेमकं कुणाच्या पथ्यावर पडणार?, याचं उत्तर मतमोजणीनंतर मिळणार आहे. 


भाजपमधील नाराजी शरद झांबरे पाटील 'कॅश' करणार का?. 


या निवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराच्या नावाची मोठी चर्चा आहे. हे नाव आहे अपक्ष उमेदवार शरद झांबरे पाटील यांचं. शरद झांबरे हे भाजपाच्या सोशल मीडिया सेलचे प्रदेश स्तरावरचे पदाधिकारी राहिलेले आहेत. हेच शरद झांबरे कधीकाळी डॉ. रणजीत पाटलांचे कट्टर समर्थक होते. झांबरेंनी डॉ. रणजीत पाटील राज्यमंत्री असतांना त्यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र, पुढे त्यांच्यात बिनसलं आणि झांबरेंनी डॉ. पाटलांची साथ सोडली. निवडणुकीच्या सहा महिन्यापुर्वीपासूनच झांबरेंनी निवडणुकीची तयारी करीत डॉ. पाटील यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली. त्यांनी प्रचारातून कायम डॉ. पाटलांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे. अकोला जिल्ह्याच्या राजकारणात खासदार संजय धोत्रे आणि डॉ. रणजीत पाटील यांचे पक्षांतर्गत गट आहेत. झांबरेंना पाटलांच्या विरोधातील असंतोषाचा फायदा या गटाच्या माध्यमातून होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच इतर जिल्ह्यातही डॉ. पाटील यांच्याविरोधात पक्षात असलेल्या असंतोषाचा आपल्याला फायदा होऊ शकतो अशी झांबरेंची अपेक्षा आहे. झांबरेंना याच बळावर 'चमत्कार' घडण्याची अपेक्षा आहे. मात्र, सध्यातरी संपुर्ण मतदारषंघातील भाजप पक्षसंघटन रणजीत पाटलांमागे उभं असल्याचं चित्रं आहे. मात्र, झांबरेंच्या उमेदवारीची चर्चा राज्यपातळीवरही चर्चेत आहे. 


सरनाईकांच्या शिक्षक मतदारसंघातील 'पैठणी पॅटर्न'ची चर्चा : 


या निवडणुकीत आणखी एका उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे. या उमेदवाराचं नाव आहे अरूण सरनाईक. 2020 मध्ये शिक्षक मतदारसंघात 'पैठणी पॅटर्न'मूळे चर्चेत आलेले शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचे ते भाऊ आहेत. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत इतर उमेदवारांच्या तुलनेत कुठेही लढतीत नसतांना थेट निवडून येण्याचा 'चमत्कार' किरण सरनाईक यांनी केला होता. त्यांच्या निवडणुकीसारखाच 'चमत्कार' ते याही निवडणुकीत करतात का?, याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे. याशिवाय 'आप'च्या पाठिंब्यावर लढत असलेल्या अकोल्यातील भारती दाभाडे आणि काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार श्याम प्रजापती यांच्या नावाचीही चर्चा महत्वाच्या उमेदवारांमध्ये होते. 


मतदारसंघाचा भौगोलिक विस्तार दमछाक करणारा : 


पाच जिल्ह्यांच्या या मतदार संघात 30 विधानसभा मतदार संघ असून 56 तालुके आहेत. मात्र यंदाची वाढलेली मतदारांची टक्केवारी कुणासाठी फायद्याची ठरणार?, याची उत्सुकता राजकीय अभ्यासकांना आहे. असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. दरम्यान, अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून एकूण 2 लाख सहा हजार 172 पदवीधरांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत असणारी नोंदणी 1 लाख 86 हजार 360 एवढी होती. यात अवघ्या पंधरा दिवसात चक्क 19 हजार 812 मतदारांची वाढ झाली. जवळपास गेल्या निवडणुकी एवढी मतदारांची संख्या झाली असल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.