अमरावती : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या खूनानंतर, महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या हत्येची चर्चा होत आहे. वैद्यकीय उपकरणांचा व्यापार करणाऱ्या उमेश कोल्हे नावाच्या व्यावसायिकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. उदयपूरमधील कन्हैया लालवर दोन जणांनी ज्याप्रकारे हल्ला केला होता, तसाच खून उमेश कोल्हे यांचा करण्यात आल्याचा संशय भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. हल्लेखोरांनी कन्हैयाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं.


अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या पाच आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितलेला नाही, पण आम्हाला एकाने हत्या करण्यास सांगितलं होतं, असं त्यांनी म्हटलं. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे. या हत्येचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपचे एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना भेटले आणि घटनेच्या मुख्य आरोपीचा तपास करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.


अनिल बोंडे यांच्याकडून पोलीस आयुक्तांची भेट
सोबतच खासदार डॉ अनिल बोंडे यांनी अजून एक गंभीर केला की, अमरावती शहरात 10 जणांना नुपूर शर्माच्या पोस्ट शेअर केल्याबद्दल धमक्या आल्या आहेत. माफीनामा लिहून घेण्यात आला मात्र या धमक्या कुणी दिल्या याचाही तपास अद्याप पोलिसांकडून झालेला नाही. विशेष म्हणजे या दहा जणांनी अद्यापही पोलिसात तक्रार दिली नाही पण समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये आणि भयमुक्त समाजाकरता आरोपींना अटक होणं गरजेचं आहे. तातडीने धमक्या देणाऱ्या लोकांना अटक करा, ज्यांना धमक्या मिळाल्या त्यांना संरक्षण द्या आणि कोल्हे यांच्या हत्येतील मास्टर माईंडला अटक करा, या मागण्यांसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली.


22 जून रोजी उमेश कोल्हे यांचा खून
अमरावती तहसील कार्यालयाजवळ असलेल्या मॉलमध्ये मृत उमेश कोल्हे यांचे अमित व्हेटर्नरी मेडिकल नावाने दुकान आहे. 22 जून रोजी हत्येच्या रात्री उमेश कोल्हे हे मुलगा संकेत आणि सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. वाटेत न्यू हायस्कूल मेन शाळेजवळ असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी उमेश कोल्हे यांची दुचाकी अडवली आणि झटापटीत कोल्हे यांच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात कोल्हे यांच्या मानेची मुख्य नस कापली गेल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच कोल्हे यांचा मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात येताच कोल्हे यांचा मुलगा आणि सून त्यांच्या मदतीसाठी धावले, मात्र अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. दोन हल्लेखोरांनी गाडी अडवून हल्ला केला आणि पसार झाले अशी माहिती उमेश कोल्हे यांच्या मुलाने पोलिसांना दिली.



पाच जणांना अटक
पोलीसांनी या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. हत्येनंतर 23 जून रोजी मुदस्सीर अहमद आणि शाहरुख पठाण यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अब्दुल तौफिक शेख आणि शोएब खान यांना अटक केली आणि नंतर अतीक रशीदलाही बेड्या ठोकल्या.  पण हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. गुन्ह्याचा सर्व बाजूने तपास तसंच तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास सुरु आहे, असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण आणि ही हत्या का केली याचं लवकरच पोलीस तपास करेल अशी सर्वांना अपेक्षा आहे.


पोलिसांकडून सूचना जारी
या संदर्भात पोलिसांनी नुकतीच एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे की, "काही वादग्रस्त पोस्ट, व्हिडीओ आणि सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी केलेली टिप्पणी शेअर केल्यामुळे समाजातील वातावरण गढूळ झालं आहे. या गुन्ह्याच्या संबंधाने कोणीही धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये करु नये. तसे केल्यास कलम 153 (अ) भा.दं.वी. प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद करण्यात येईल."