Maharashtra Akola News : राज्यातील दुसरी सर्वात मोठी शिक्षणसंस्था असलेल्या अमरावती (Amravti) येथील शिवाजी संस्थेची निवडणूक काल पार पडली. मतदानानंतर लगेच झालेल्या मतमोजणीत सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख (Harshvadhan Deshmukh) यांच्या 'प्रगती पॅनल'नं 9 पैकी 8 जागा जिंकत सत्ता राखली आहे. तर विरोधी 'विकास पॅनल'ला उपाध्यक्षपदाच्या एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचा 127 मतांनी पराभव केला आहे. हर्षवर्धन देशमुख यांना 389 मतं मिळाली आहेत. तर पराभूत उमेदवार नरेशचंद्र ठाकरे यांना 270 मतं मिळाली आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्राचे 'लोककवी' म्हणून ओळख असलेले जेष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ यांचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. डॉ. वाघ यांनी संस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत निवडणूक रिंगणात उडी घेतली होती. यासोबतच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे हेसुद्धा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
असे आहेत 'शिवाजी शिक्षण संस्था' निवडणुकीतील निकाल
विदर्भात अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी यावेळी चांगलीच गाजली. रयत शिक्षण संस्थेनंतर महाराष्ट्रातील दुसरी सर्वात मोठी शिक्षण संस्था अशी या संस्थाची ओळख आहे. अतिशय रंगतदार झालेल्या या निवडणुकीत दोन पॅनल रिंगणात होते. गेल्या पाच वर्षात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पॅनलमध्येच फुट पडल्यानं निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. तर या दोन्ही पॅनलवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत जेष्ठ साहित्यिक आणि कवी विठ्ठल वाघांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकले होते. संस्थेचे 774 आजीव सदस्य या निवडणुकीसाठी मतदार होते. काल झालेल्या निवडणुकीत 86.80 टक्के मतदान झालं होतं. यात 774 पैकी 672 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर लगेच अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात मतमोजणी झाली. यात सध्याचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुखांच्या 'प्रगती पॅनल'नं बाजी मारली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुखांना 397 मतं मिळाली आहेत. तर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेशचंद्र ठाकरे यांना 270 मतं मिळाली आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'प्रगती पॅनल'चे देशमुख प्रमुख हर्षवर्धन देशमुखांनी 'विकास पॅनल'च्या नरेशचंद्र ठाकरेंचा 127 मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या तीनपैकी दोन जागांवर 'प्रगती'नं तर एका जागेवर 'विकास'नं कब्जा केला. उपाध्यक्षपदी 'प्रगती'चे गजानन पुंडकर, केशवराव मेतकर आणि 'विकास'चे जयवंत उर्फ भैय्यासाहेब पाटील पुसदेकर विजयी झाले आहेत. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभूतांमध्ये अरबट, डॉ. शेळकेंसह जेष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद तसरे यांचा समावेश आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत गजानन पुंडकर यांना 392, भैय्यासाहेब पुसदेकर यांना 318 आणि केशवराव मेतकर यांना 295 मते मिळालीत. तर पराभूत उमेदवार अरबट यांना 289, डॉ. शेळके 285, शरद तसरे 186 आणि अपक्ष असलेल्या विठ्ठल वाघांना 135 मतं मिळाली आहेत.
कोषाध्यक्षपदाच्या निवडणुकीत 'प्रगती'चे दिलीपबाबू इंगोले यांनी 'विकास'च्या बाळासाहेब वैद्य यांचा 182 मतांनी पराभव केला. इंगोले यांना 424 तर वैद्य यांना 242 मतं मिळालीत. तर सदस्यपदाच्या चारही जागांवर 'प्रगती'नं कब्जा केला आहे. सदस्यपदासाठी हेमंत काळमेघ 490, केशवराव गावंडे 387, सुरेश खोटरे 331 आणि सुभाष बनसोड 289 मते घेऊन विजयी झाले आहेत.
मतदान केंद्रावरील 'राड्या'ने गाजली निवडणूक
शिवाजी शिक्षण संस्थेसाठी काल अमरावती येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील पाच मतदान केंद्रांवर मतदान झालं होतं. यात मतदानावेळी मतदारांना प्रलोभन आणि विशिष्ट उमेदवारांच्या प्रचारावरून दोन्ही गटांत जोरदार 'राडा' झाला होता. यात अध्यक्षपदाचे उमेदवार हर्षवर्धन देशमुख, मोर्शीचे आमदार देवेंद्र भूयार यांना धक्काबुक्की झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं होतं.
लोककवी डॉ. विठ्ठल वाघांच्या उमेदवारीने निवडणुक चर्चेत
या निवडणुकीतील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, जेष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी डॉ. विठ्ठल वाघांनी उपाध्यक्ष पदासाठी आपली स्वतंत्र उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी दोन्ही पॅनलवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. भाऊसाहेबांनी बहूजन समाजाच्या हितासाठी स्थापन केलेल्या संस्थेतील भ्रष्टाचार पहावत नसल्यानं पंचाहत्तरी ओलांडलेल्या वाघांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं होतं. मात्र, डॉ. विठ्ठल वाघ यांचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना 135 मतं मिळाली आहेत. डॉ. विठ्ठल वाघ शिवाजी शिक्षण संस्थेच्या अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयाचे 1995 ते 2002 या कालावधीत प्राचार्य होते.
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांनी केली 'शिवाजी शिक्षण संस्थे'ची स्थापना
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुखांनी 1 जुलै1932 रोजी संस्थेची स्थापना केली आहे. गरीब बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारं खुली व्हावी असा उदात्त हेतू त्यामागे होता. विदर्भातील 11 जिल्ह्यात संस्थेची 315 शाळा-महाविद्यालयं आहेत. संस्थेत दिड लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर दहा हजारांवर कर्मचारीवर्ग संस्थेत कार्यरत आहे.
शिवाजी संस्थेचा पसारा
एकूण शाळा : 315
कार्यक्षेत्र : विदर्भातील 11 जिल्हे
इंजिनिअरींग कॉलेज : 01
वैद्यकीय कॉलेज : 01
विद्यार्थी : दिड लाख
कर्मचारी : 10 हजार
मतदार : 774
संस्थेचे आतापर्यंतचे अध्यक्ष
1) भाऊसाहेब संस्थापक अध्यक्ष : 1932 ते 1965
2) बाबासाहेब घारफळकर : 16 मे 1965 ते 22 मे 1977
3) भ. मा. उपाख्य रावसाहेब इंगोले : 23 मे 1977 ते 31 मे 1987
4) प्रा. वा. उपाख्य दादासाहेब काळमेघ : 1 जून 1987 ते 9 जुलै 1993 आणि 5 जून 1995 ते 31 मे 1997
5) वसंतराव धोत्रे : 1 जून 1997 ते 31 मे 2007
6) महादेवराव भूईभार : 17 नोव्हेंबर 1993 ते 4 जून 1995
7) अरूण शेळके : 10 जुलै 1993 ते 16 नोव्हेंबर 1993
1 जून 2007 ते 14 सप्टेंबर 2017
8) हर्षवर्धन देशमुख : 15 सप्टेंबर 2017 ते आतापर्यंत
भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी स्थापन केलेली ही संस्था. त्यांनी समोर ठेवलेला उदात्त हेतू, ध्येय सध्याच्या संस्थेतील राजकारणात टिकणं फार आवश्यक आहेय. सध्याच्या आरोप-प्रत्यारोपात संस्थेचं वैभव टीकावं अन गरिबांच्या शिक्षणाच्या माहेरघराचं महत्व अबाधित राहण्यासाठी नव्या सत्ताधार्यांनी प्रयत्न करावेत, हिच सदिच्छा.