अकोला : शिंदे गटाचे 'काय झाडी, काय डोंगार' फेम आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात सध्या चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतंय. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा संजय राऊत होणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर आता अमोल मिटकरींनी त्यांच्या शैलीत उत्तर देत शहाजी पाटलांवर पलटवार केला आहे. ते शिंदे गटाचे 'जॉनी लिव्हर' आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी शहाजीबापूंवर केली आहे. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होते.


सध्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil) हे करमणुकीचं पात्र आहे. शिंदे गटाचे जॉनी लिव्हर, या पलीकडे त्यांची कुठलीही प्रतिमा महाराष्ट्रात नाही. त्यांच्या मतदारसंघात शून्य विकास आहे. त्यामुळे त्यांनी माझी काळजी न करता शिंदे गटात त्यांची कशी ओढाताण सुरू आहे, याची काळजी घ्यावी, असा टोला आमदार मिटकरींनी (Amol Mitkari) लगावला आहे. 


शिंदे गटात तुम्ही सध्या कितीही डायलॉगबाजी केली. तरी तुम्हाला कॅबिनेट तर सोडा साधं राज्यमंत्री हे पदही भेटणार नसल्याचं मिटकरी म्हणाले. ही शहाजीबापूंची शेवटची टर्म असल्याचा टोला आमदार मिटकरींनी लगावला आहे.


आपली स्थिती संजय राऊतांसारखी होण्याचं बोलण्यापेक्षा शहाजीबापूंनी मतदारसंघाकडे लक्ष द्यावं, असंही मिटकरी म्हणाले. सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या गणपत देशमुखांसारख्या आदर्श संसदपटूचा वारसा चालवण्याचा दावा करीत असलेल्या शहाजीबापूंनी गणपतरावांचा वारसा धुळीस मिळवल्याचं म्हटलं आहे. गणपतरावांनी अखेरपर्यंत बसमधून प्रवास केला. मात्र शहाजीबापूंनी गुवाहटीच्या झाडी, डोंगरच्या माध्यमातून गणपतराव देशमुखांचा आदर्श धुळीस मिळवण्याचं काम केल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.


काय म्हणाले होते शहाजीबापू पाटील?


एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली होती. अमोल मिटकरी यांचा लवकरच संजय राऊत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता आ. अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. या आधीही या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला होता. 


महत्त्वाच्या बातम्या :