अकोला : शिक्षण क्षेत्रातील घडामोडी आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे गेल्या काही महिन्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. बदलापूरमधील एका शाळेत बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर, ठिकठिकाणी शाळा आणि शिक्षणाधिकारी यांनी अशा घटना होणार नाहीत, याची काळजी घेतली. तर, राज्य सरकारने देखील कठोर नियमावली बनवली. मात्र, शाळेतील (School) स्टाफबाबतही असाच प्रकार घडल्याचेही पाहायला मिळत आहे. अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातून अशी घटना समोर आली असून मुख्याध्यापकानेच शरीर सुखाची मागणी केल्याने पीडित शिक्षिकेने आंदोलनाचा मार्ग स्वीकरला आहे. या घटनेनं जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक तरुणीने आमरण उपोषण सुरू केलं आहे. अकोट येथील एका शाळेत शिक्षिका म्हणून असलेल्या या तरुणीकडे येथील शाळेतील मुख्याध्यापकानेच शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही या शिक्षिकेने केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणात मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल असला तरी अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोपही या तरुणीने केला आहे.  


शहरातील विद्यालयात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकावर अटकेची कारवाई करत तात्काळ त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी शिक्षिकेने आमरण उपोषण सुरू केलं आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग मौन बाळगून बसलाय. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही आरोपी शिक्षकाच्या पत्नीने ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम अकोट पोलिसांना करावं लागणार आहे. मात्र, मुख्याध्यापकांविरुद्धच शिक्षिकेनं आंदोलन सुरू केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा


ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्रिपद दिलं जातं; गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले