अकोला : बातमी आहे 'एबीपी माझा'च्या 'इम्पॅक्ट'ची. आम्ही 14 जुलैला अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द गावाची व्यथा महाराष्ट्रासमोर मांडली. दुसऱ्या दिवशी अख्खी सरकारी यंत्रणा, प्रशासन गावात पोहोचलं. बातमीची दखल घेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या गावाला भेट दिली. आज हा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. हा प्रश्न होता 'एबीपी माझा'नं आपल्या बातमीच्या माध्यमातून या गावाला नसलेल्या रस्त्याचा आणि पुलाचा. अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द व झुरळ बुद्रुक या दोन गावांना जोडणारा पूल नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. या विषयावर आमदार अमोल मिटकरी यांनी पावसाळी अधिवेशनात महत्त्वाची लक्षवेधी लावून शासनाचे लक्ष या विषयाकडे वेधले. त्यामुळे 30 डिसेंबरपर्यंत या दोन्ही गावांना जोडणारा पूल तयार होईल असे आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले आहे. यासह या गावाचे नाव पूर्वीप्रमाणे 'रतनपुरी' करावे अशी मागणीसुद्धा आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. आज आमदार अमोल मिटकरींनी गावकऱ्यांचं दु:ख मांडणाऱ्या 'एबीपी माझा'चा गौरव करीत आभार मानले आहेत.
दरम्यान, या दोन्ही गावांना जोडणारा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. डिसेंबर महिन्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्तेच या पुलाचे उद्घाटन करू असं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत आमदार मिटकरींच्या प्रश्नावर दिले.
काय आहे झुरळ खुर्द गावाची समस्या?
आपलं स्वातंत्र्य पंचाहत्तरीत येऊन ठेपलंय…. जागतिक महासत्तेची गोड स्वप्नंही आपण पाहतोय. मात्र, याच स्वप्नांचा पाया असणारी देशातील हजारो खेडी अद्यापही मरणयातना भोगत आहेत. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करतांना रस्ता अन पुलासाठी झगडणाऱ्या अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द गावाची कथा अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. नशिबात फक्त चिखल अन पुराचं पाणीच असणारं गाव त्यांच्या गावासाठी रस्ता शोधतं असल्याचा 'स्पेशल रिपोर्ट 'एबीपी माझा'नं मागच्या महिन्यात 14 जुलैला करीत त्यांचं दु:ख जगासमोर मांडलं होतं.
झुरळ हे अकोला शहरापासून फक्त 30 किलोमीटरवर असलेलं चारशे लोकवस्तीचं गाव. मात्र, या गावाला ना रस्ता आहे, ना गावाशेजारच्या पानखास नदीवर मोठा पुल. त्यामूळे सर्वांना हवाहवासा वाटणारा पावसाळा आला की येथील नागरिकांच्या हृदयात अगदी चर्र होऊन जातंय. गावात चौथीपर्यंतच शाळा असल्यानं विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी उरळ आणि अकोल्याला जातात. मात्र, या विद्यार्थ्यांचे पावसाळ्याचे चार महिने रस्ता, नदी, पुल अन पुरामूळे अक्षरश: पाण्यात जातात.
पावसाळ्यात रस्ता आणि पुलाअभावी गेलेत जीव
या गावात पावसाळ्यात रुग्णांची तर प्रचंड हेळसांड होते. पावसाळ्यात रस्ता आणि पुरामूळे वेळेत न उपचार मिळाल्याने अनेकांना जीवाला मुकावं लागलंय. सहा वर्षांपूर्वी गावातील संतोष घ्यारेंना याच रस्ता आणि पुरामुळे स्वत:चा चार वर्षांचा मुलगा गमवावा लागला होता. सर्पदंश झालेल्या मुलाला ते वेळेवर उपचार देऊ शकले नव्हते.
गावकऱ्यांनी उपसलं होतं आंदोलनाचं हत्यार
या गावकऱ्यांनी रस्ता आणि पुलासाठी मतदानावर बहिष्काराचं अस्त्रही उपसलं होतंय. अन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं होतं. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना मिळाली ती पुढची तारीख अन खोटं आश्वासन. उरळ खुर्द गावाकडून केलेला पुलही अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडला आहे. गावकऱ्यांनी रस्ता आणि पुलासाठी शासन अन लोकप्रतिनिधींचे दोन दशकांपासून उंबरे झिजवलेत. ना त्यांच्या रस्त्यासाठी जमिनीचं अधिग्रहण झालं, ना पानखास नदीवरचा पुल. आता थकलेले गावकरी गावच येथून हलविण्याची मागणी करीत आहेत. त्यामूळे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गावकर्यांना आता प्रश्न तडीस जाण्याची आस लागली आहे.
'एबीपी माझा इम्पॅक्ट'
आम्ही 14 जुलैला अकोला जिल्ह्यातील झुरळ खुर्द गावाची व्यथा महाराष्ट्रासमोर मांडली. दुसऱ्या दिवशी अख्खी सरकारी यंत्रणा, प्रशासन गावात पोहोचलं. बातमीची दखल घेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कंबर पाण्यातून जात आणि अक्षरश: चिखल तुडवत या गावाला भेट दिली होती. माझा'च्या बातमीनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर गावात आरोग्य विभागाचं पथक औषधं घेऊन पाठविण्यात आलं होतं. यासोबतच गावातच 'एसडीआरएफ'ची एक तुकडी तयार ठेवण्यात आली होती. आता सरकारनं चार महिन्यांत या गावाची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिलं.
झुरळ खुर्दची भयावह स्थिती पाहिली तर आपण महासत्ता होऊ पाहणार्या याच भारतात राहतो काय?. प्रगतीचे ढोल बडवणारा हाच आपला महाराष्ट्र का?, असे प्रश्न पडतात. आता सरकारच्या आश्वासनानंतर तरी गावकऱ्यांच्या दु:खाचे दशावतार संपतील अशी अपेक्षा.