Akola Rain Updates : अकोला (Akola) जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अजूनही अकोला शहरासह अनेक भागांत रिपरिप पाऊस सुरु आहे. अनेक नदी नाल्यांना पूर येत आहे. दरम्यान, अकोला शहरातील मनपा क्षेत्रात नव्यानं हद्दवाढ झालेल्या गुडधीमध्ये अनेक घरात नाल्याचं पाणी शिरलं आहे. अनेक घरातील कपडे धान्यसह वस्तूंच मोठं नुकसान झालं आहे. तर ज्यांचं मातींचं घर आहे, त्यांचंही मोठं नुकसान झालं. या संदर्भात अनेक वेळा मनपा प्रशासनाला तक्रार करूनही कुठलीही पावलं उचलण्यात आली नाही, असा आरोप वंचितनं केला आहे. 


जोरदार पावसामुळे तसेच पाणी वाहुन जाण्यास जागा नसल्यानं शहरातील अनेक सखल भागांत पाणी शिरलं. थांबलेलं पाणी जाण्यास मार्ग नसल्यानं नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आहे. दिवस आणि रात्रभर झालेल्या पावसामुळे पार्वती नगर, समर्थ नगर भागांत लोणटेक नाल्या लगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. या नागरिकांना आपलं घर सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. तर गुरुदत्त नगर, नरहरी महाराज मंदिर परिसर, मेहरे नगर, भिरड-ले-आऊट, खडकी परिसरातील म्हाडा कॉलनी आदी परिसरातील अनेक घरे पाण्यानं वेढले असून, रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दिवसभर पाऊस सुरु असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.


'या' भागांत झालं पावसामुळे नुकसान 


अकोला शहरातील गुडधी, खदान परिसर, जेतवन नगर, कवाडे नगर, महात्मा फुले नगर, कैलास टेकडी, सिंधी कँम्प, अकोली, सिद्धार्थवाडी, यशवंत नगर, पंचशिल नगर, कमला नगर, रमाबाई नगर, हरीहरपेठ, डाबकी, भौरद, गजानन नगर, गुलजारपूरा, गडंकी, अकोंटफैल परीसर, नायगांव आदी भागातील नाल्यांची साफसफाई नसल्याने नाल्यांचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. यामध्ये जीवनाश्यक वस्तुंसह मोठे नुकसान झालं आहे. 



मोर्णा नदी दुथडी भरुन वाहतंय 


अकोला तालुक्यात 37.6 मिमी पाऊस झाला. तर पातूर, बार्शीटाकळी तालुक्यातही जोरदार पाऊस झालेला आहे. शहरातून वाहणारी मोर्णा नदी अकोला, पातूर तालुक्यातून वाहते तर बार्शीटाकळी तालुक्यातील विद्रूपा नदी शहरालगत मोर्णा नदीला येऊन मिळतं. त्यामुळे शहरासह या तालुक्यात झालेल्या पावसामुळे शहरातून वाहणारी मोर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. प्रशासनानं नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


नाल्याच्या पाण्यात बसून वंचितचं केलं आंदोलन 


गेल्या आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे अकोला शहरातील नाल्यांची साफसफाई नसल्यानं त्या तुडुंब भरल्या. या नाल्यांमधुन रस्त्यांवर एक ते दोन फुट पाणी साचल्यानं वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कागदी जहाज सोडून आंदोलन करण्यात आले. तर गुडधीमध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे यांनी स्थानिक नागरिकांसह वंचितनं मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात चक्क नाल्याच्या पाण्यात बसून आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केल्या आहे. तर लहान उमरी ते मोठी उमरी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. या सासलेल्या पाण्यावर त्यांनी कागदाची नाव चळवळ सरकारचा वेगळा निषेध नोंदवला. त्यानंतर मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची भेट घेतली अन् तत्काळ दखल घेण्याची मागणी केली. 


अनेक शेतात नाल्याचं पाणी शिरलं


अकोट तालुक्यात अनेक शेतात नाल्याचं पाणी शिरलं. भरपावसात अकोट तालुक्यातील केळीवेळी, गिरजापूर, धारेल परिसरात बुडालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार निलेश मडके हे मंडळ अधिकारीसह तलाठी घेऊन दौऱ्यावर आहेत. पाऊस सुरुच असल्याने जिल्ह्यात अनेक भागांत पाणी साचलेल्या शेतातील पिकासह जमीन खरडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 


गांधीग्राम पुलावरुन 7 ते 8 फुट पाणी; अकोट-अकोला रस्ता बंद


अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदिला मोठा पूर आला. या पुलावरून पाणी जात असल्याने अकोट-अकोला आणि अकोला-अकोट मार्ग बंद झाला. हा मार्ग अकोला शहर आणि अकोट तालुक्याला जोडणारा मार्ग आहे. नागरिकांनी सदर मार्गावर प्रवास टाळावा जेणेकरून आपल्याला होणारा त्रास टाळता येईल, असे आवाहन दहिहांडा पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी केले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुकामधील पुर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उंची 30 सेमीने उघडले आहे, यातून विसर्ग 193 घ.मी.प्र.से. पाणी पुर्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता अकोल्यातील गांधीग्रामच्या पूर्णा नदी पुलावरून तब्बल सात ते आठ फूट पाणी वाहतंय.