अकोला : 'राजकारणात सर्वकाळ कुणीच कुणाचं शत्रू आणि मित्रं नसतं', असं सर्रासपणे बोललं जातं. गेल्या पाच वर्षांत हेच आपल्या राज्यात झालेल्या अनाकलनीय राजकारणानं उभ्या महाराष्ट्रानं हे अनुभवलंय. मात्र अकोल्याच्या राजकारणानं दोन नेत्यांमधील राजकारणापलिकडची मैत्री गेल्या अडीच दशकांत फार जवळून अनुभवलीय. ही मैत्री म्हणजे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre)  आणि आमदार गोवर्धन शर्मा  (Gowardhan Sharma) यांची.


गोवर्धन शर्मा हे 1995 पासून अकोला शहराचे आमदार. 1995 ते 1998 या काळात ते राज्यमंत्रीही होते. तर संजय धोत्रेंचा अकोल्याच्या राजकीय पटलावरचा उदय 1999 मधला. संजय धोत्रे 1999 मध्ये मुर्तिजापूर मतदारसंघातून आमदार होते. तर गोवर्धन शर्मा अकोला शहराचे. मात्र संजय धोत्रेंच्या उदयापासून गोवर्धन शर्मांनी संजय धोत्रेंना संपूर्ण राजकीय ताकद दिली. याच मैत्रीतून पुढे संजय धोत्रे 2004 पासून सातत्यानं चारदा सलग अकोल्यातून खासदार म्हणून विजयी झाले. 


गेल्या 2019 च्या निवडणुकीत संजय धोत्रे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रातून ते गोवर्धन शर्मांना दुचाकीवर कार्यकर्त्यांपर्यंत घेऊन आलेत. हा फोटो त्यांच्यातील मैत्रीची सहजता दर्शविणारा आहे. अकोल्याच्या राजकारणात या दोघांत वर्चस्ववाद अन् त्यातून येणारी कटूता कधीच न आल्याने त्यांची मैत्री अभंग होती. 


गेल्या दोन वर्षांपासून संजय धोत्रे हेसुद्धा एका दुर्धर आजाराने अंथरुणाला खिळून आहेत. वर्षभरापूर्वी कॅन्सरची लागण झालेल्या गोवर्धन शर्मा यांचं 3 नोव्हेंबरला रात्री निधन झालं अन् अकोल्याच्या राजकारणातील 'दोन हंसां'मधला एक हंस कायमचा सोडून निघून गेला. त्यांच्या मैत्रीतील 'वीण' किती घट्ट होतीय हे अनेक घटनांतून दिसून आलंय. 


गोवर्धन शर्मा यांचा राजकीय प्रवास


गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 


1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात 'लालाजी' नावाने लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं. 


ही बातमी वाचा: