Akola News : राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे दंगलग्रस्त भागाला भेट देण्यासाठी आज अकोल्यात (Akola) आले आहेत. यावेळी दानवेंनी दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाडच्या कुटुंबियांची भेट घेतली. अकोल्याची दंगल (Akola Riots) हे राज्य सरकार आणि गृहविभागाचं अपयश असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. दंगली सरकार प्रायोजित आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला


अकोल्यात दाखल झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वराचं दर्शन घेतलं. यासोबतच दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाडच्या कुटुंबियांची दानवेंनी भेट घेतली. विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी दंगलग्रस्त हरिहरपेठ भागातील नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, अकोल्याची दंगल हे राज्य सरकार आणि गृहविभागाचं अपयश असल्याचा आरोप केला.


दंगलीशी संबंध नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू


"अकोल्यातील चित्र भयानक आहे. कारण घडलं त्यामुळे दंगल घडायला नको होती. एखाद्या माथेफिरुने पोस्ट केली, त्याच्यावर कारवाई करायला हवी. हकनाक जीव जाणं दुर्दैवी आहे. त्याचा या दंगलीशी काही संबंध नव्हता. कोणत्याच गटात नसलेल्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला. दंगल घडवलेली दिसत आहे. अकोल्याची दंगल हे राज्य सरकार आणि गृहविभागाचं अपयश आहे," असं अंबादास दानवे म्हणाले.


दंगली सरकार प्रायोजित आहेत का?


महाराष्ट्रातील सौहार्दाचं वातावरण काहींना बिघडवायचं आहे. अकोला, शेवगाव येथील दंगलींना राज्य सरकारचे संरक्षण आहे. या दंगली सरकार प्रायोजित आहेत का? असा सवाल अंबादास दानवेंनी विचारला. तसंच दंगल पूर्वनियोजित होती असं गिरीश महाजन म्हणाले. मग दंगल थांबवली का नाही, असंही ते म्हणाले. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतिशय निष्क्रिय आहेत, असा आरोप त्यांनी केला आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला पत्र लिहिणार असल्याचं दानवेंनी सांगितलं. सोबतच दंगलीत मरण पावलेल्या विलास गायकवाडच्या पत्नीला सरकारी नोकरी द्या अशी मागणी करत मृताच्या मोठ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी ठाकरे गटाने घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 


'फडणवीस जबाबदारी पार पाडत नसतील तर तो त्यांचा विषय'


राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप अकोल्याला भेट दिली नाही. त्यांच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप होत आहे, यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, "यावर राजकारण करण्यापेक्षा दंगली का घडतात, त्याला कोण पाठिंबा देतं, दंगलीचा उद्देश काय आणि त्यात कोणाचा बळी जातो, याचा विचार सगळ्यांनी करण्याची गरज आहे. ते त्यांची जबाबदारी पार पाडत नाहीत, हा त्यांचा विषय आहे."


आम्ही शिल्लकसेना आहे तर घाबरता का? दानवेंचा फडणवीसांना सवाल


सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरेंवर टीका केली, सोबतच ठाकरे गटाचा शिल्लकसेना असाही उल्लेख केला. यावर अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे. "जर आमची सेना शिल्लकसेनेला का आम्हाला घाबरता? आमचा पक्ष आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न का करता? निवडणुका होऊ द्या जनताच उत्तर देईल शिल्लकसेना कोणती?" असं अंबादास दानवे म्हणाले.


वादग्रस्त पोस्टमुळे अकोल्यात दंगल


अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये मोठी दंगल उसळली होती. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. यात काही ठिकाणी दंगलखोरांनी आगीही लावल्याच्या घटना घडल्या. दंगलखोरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमावावर अश्रूधुराचा माराही केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले होते. एका व्यक्तीच्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जातं आहे. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दंगलीत एकाचा मृत्यू झाला. तर दोन्ही गटातील 10 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.