Akola Rain : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात आज 9 जुलैपर्यंत अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अंदाजानुसार काल अकोल्यात मुसळधार पाऊस झाला. आता अकोला जिल्हा प्रशासनाने या संदर्भात लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आलं. दरम्यान, जिल्ह्यातील आगर गावात परवाच्या पावसाने चांगलेचं थैमान घातले. परवा सायंकाळी गावालगत असलेल्या लेंडी नाल्याला पूर आला. या पुराचे पाणी गावातील सुमारे 50 ते 60 घरात शिरले होते. पुढील कालावधीत नदी-नाल्या काठावरील गावांना आणि शहरी भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे पाणी वाहत असताना पोहण्यास जाऊ नये म्हणजे नदीत उड्या घेऊ नये, रस्त्यावरुन, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने काढताना काळजी घ्या, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.


आगर गावात अनेकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले




दरवर्षी आगार या गावात पावसाने जोरदार हजेरी लावली की नाल्याला पूर येतो आणि अनेकांच्या घरात पाणी शिरते. परवाही आगरमध्ये पावसाने थैमान घातलं. अन् गावालगत असलेल्या लेंडी नाल्याला पूर आला. या पुराचं पाणी गावातील सुमारे 50 ते 60 घरात शिरलं. सोबतच नाल्याच्या पाण्यातील सापही नागरिकांच्या घरात शिरले. गावाजवळून वाहणाऱ्या चिंचखेडा नाल्याला सुद्धा पूर आला. तर मोठी उमरीसह जिल्ह्यातील अनेक भागातील लोकांचं या पावसामुळे नुकसान झालं. 


अनेक भागात शेताला तलावाचे स्वरुप




जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचं मोठ नुकसान झालं. तर घूसर ते उगावा रस्त्यावरील शेतात पाणी साचल्याने शेताला तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सोयाबीन शेतात पाणी साचल्याने आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट उभ ठाकले आहे. आता शासनाने पंचनामे करावे करुन मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयातही साचले पाणी
दरम्यान, परवा सायंकाळी झालेल्या तब्बल दीड तासाच्या मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसाचे पाणी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात साचले होते. निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या कार्यालयाजवळही पाणी जमा झाले होतं. अनेक अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर हे पावसाचे पाणी साचलं होतं.


आतापर्यत जिल्ह्यात तीन व्यक्तींचा वीज पडून मृत्यू 
यंदाच्या जून महिन्यापासून  बार्शीटाकळी तालुक्यातील निंबी, अकोला तालुक्यातील मजलापूर आणि पातुर तालुक्यातील आलेगाव या गावात तीन व्यक्ती वीज पडून मृत झाल्या आहेत. तर सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 20 घरांची अंशतः पडझड झाल्याची नोंद आहे. मागील जून महिन्यातच अतिवृष्टी आणि पुरामुळे 1 हजार 335 हेक्टर आर क्षेत्रावर शेती पीक आणि फळपिकांचे नुकसान झाले असून पंचनामे सुरु आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 3 लक्ष 61 हजार 308 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या असून प्रमाण 78.25 टक्के इतके आहे.


जिल्ह्यातील अशी आहेत पुरबाधित गावे
पूरबाधित गावांची नावे अकोला तालुका- अकोला शहर, म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, गांधीग्राम, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदुर, सांगवी बु., कुरणखेड, गोत्रा, आगर. बार्शीटाकळी तालुका- चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबोरा, वरघेड, वाघजळी, दोनद खु., टाकळी, राजंदा, सुकळी, वरखेड, सिंदखेड. अकोट तालुका- केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरि, पिकलवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरुर. तेल्हारा तालुका- मन्नात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवई, उमरी, पिळवंद, दानापुर, सौदाळा, वारखेड. बाळापूर तालुका- वाडेगाव, बाभुळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण, रिधोरा, सोनाळा, बोरगाव वैराळे. पातुर तालुका- पाटसुल, भंडारज खु., आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा. मुर्तिजापूर तालुका- हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापुरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही, उनखेड या गावात खबरदारीच्या व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरबाधित गावांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्यासाठी शाळा खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दलातील सदस्यांचे प्रशिक्षण झाले असून सर्व साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.


जिल्ह्यातील आतापर्यंतचा जलसाठा 
आज सकाळपर्यंत अकोला जिल्ह्यात मोठे 2, मध्यम 3 तर लघू 33 असे एकूण 38 प्रकल्प आहेत. मोठ्या प्रकल्पांपैकी काटेपूर्णा प्रकल्पात 25.96 द.ल.घ.मि, वान धरणात 32.93 द.ल.घ.मि, मध्यम प्रकल्पांपैकी उमा धरणात 1.72 , मोर्णा प्रकल्पात 15.94 तर निर्गुणा प्रकल्पात 7.62 द.ल.घ.मि. जलसाठा शिल्लक आहे.


अशी घ्याल खबरदारी 
वीज, वादळाची स्थिती जाणवताच टीव्ही, संगणकासह विद्युत उपकरणे स्त्रोतापासून अलग करुन वीज वादळाच्या स्थितीत मोबाईल फोनही वापरताना काळजी घ्या, अन् घरात रहा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करत असल्यास आपले वाहन विजेच्या खांबाजवळ किंवा झाडाखाली थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय आणि श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी लगेच हृदयाजवळील भागास मालिश करावे आणि तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी. 'दामिनी अॅप'द्वारे विजेबाबत पूर्व परिस्थिती जाणून घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.