अकोला : अकोल्यातल्या (Akola News) पातूर तालुक्यातील (Patur Taluka) मळसूर गावातील एक परंपरा अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे. ही परंपरा आहे निखाऱ्यांवरून चालण्याची... मळसूर गावात सोपीनाथ महाराजांचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात सोपीनाथ महाराजांच्या  यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा पाळली जाते.  मळसूर गावात देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्नीपरिक्षा देण्यात आली. निखावरूऱ्यांन चालताना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी इथल्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची श्रद्धा आहे. 


धगधगते गरम निखारे आणि त्यावर चालणारे भाविक हे चित्र डोळ्यासमोर आले तरी अंगावर  अक्षरश:  काटा येतो. परंतु ही अग्नीपरीक्षा भाविकांकडून दिली जाते. अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या मळसूर गावात ग्रामदैवत सोपीनाथ महाराजांचं पुरातन मंदिर आहेय. माघ महिन्यात गावात सोपीनाथाची यात्रा असते. या यात्रेत देवाचं लग्नं असतंय. देवाच्या लग्नाच्या अक्षता पडल्या की, त्यानंतर ही 'अग्निपरिक्षा' असते.  लाकडाच्या गरम  निखाऱ्यांवरून भाविक चालतात. गावकरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा पाळत आहेत.


सोपीनाथ महाराजांकडे भाविक साकडं घालतात. पती-पत्नींनी जोडीनं सोपीनाथाकडे साकडं घालण्याची परंपरा आहे. मनातली इच्छा पूर्ण झाल्यावर जोडीनं सोपीनाथाप्रती कृतज्ञता म्हणून निखाऱ्यावर चालण्याची ही परंपरा आहे. या उत्सवाच्या दिवशी गावातील माहेरवाशिणी देखील या दिवशी आवर्जून माहेरी येतात.  मात्र धगधगत्या निखाऱ्यावर चालणं यात कोणताच चमत्कार नसल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते सांगतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील सीमारेषा ही फार पुसट आहे. श्रद्धेच्या अतिरेकातून अंधश्रद्धेचा जन्म होतोय. पुरोगामी महाराष्ट्रानं आपलं पुरोगामित्व जपताना अशा प्रथा, परंपरांकडे चिकित्सकपणे पहावं, एवढीच माफक अपेक्षा आहे.


अहमदनगरच्या पाथर्डीतही पेटत्या विस्तवावरून चालतात भाविक


अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथे रहाड यात्रेत देखील पेटत्या विस्तवावरून अनवानी पायाने चालण्याची परंपरा आहे. गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सापडलं होतं. त्या निमित्तानं दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते. या ठिकाणी दरवर्षी अशीच भाविकांची लांबच लांब रांग लागते. ती रांग असते पेटत्या विस्तवावरून अनवानी चालण्यासाठी. देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्याने आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा अहमदनगरच्या हनुमान टाकळी येथे जवळपास 250 वर्षांपासून जपली जात आहे. नवसपूर्ती झाली तर मंदिरासमोरील विस्तवावरून चालण्याची परंपरा आहे. यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर 12 फुट लांबीचा, 2 फूट खोल, अडीच फूट रुंद चर खोदला जातो. त्यात बोरीच्या झाडाच्या लाकडं पेटवली जातात आणि भाविक या पेटत्या विस्तवावरून चालतात.


दरम्यान, नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून, पेटत्या विस्तवावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही असं अंनिसच्या रंजना गवांदे यांनी म्हटलं आहे. आजच्या वैज्ञानिक युगात आपण कितीही पुढारलो असलो तरी आजही अनेक उच्च शिक्षित तरुण तरुणही अशा प्रथा पंरपरा जोपासताना दिसतात.