Akola Crime : नवऱ्याने बायकोच्या दोन सख्ख्या मावस भावांवर चाकूने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर झाला असून जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अकोला (Akola) जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव इथे अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली आहे. आरोपी जावयाने दोन भावांसह मिळून दोन मेहुण्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यानंतर दोघांनाही उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान यातील एकाला आपले प्राण गमवावे लागले. चेतन शामराव काळदाते (वय 27 वर्षे, रा. आलेगाव, ता. पातूर, जि. अकोला) असं मृत तरुणाचं नावं आहे. दवाखान्याच्या बिलावरुन हे हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अकोल्यातील चान्नी पोलीस तपास करत आहेत.


काय आहे संपूर्ण घटना? 


अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत आलेगाव येथील शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावांवर धारदार शास्त्राने हल्ला चढवण्यात आला होता. ही घटना 29 मार्चला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात चेतन शामराव काळदाते आणि दीपक शामराव काळदाते हे दोघे भाऊ गंभीर झाले. त्यांना लागलीच अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात काळदाते कुटुंबियांनी चान्नी पोलिसांत तक्रार दिली की आलेगाव येथील महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक आणि दीपक प्रल्हाद धात्रक या तिघां भावांनी चाकूने हल्ला करुन चेतन आणि दीपक या दोघांना जखमी केले आहे. त्यानंतर या प्रकरणात तिघांवरही मारहाण तसेच हल्ला चढवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लागलीच तिघांनाही अटक करण्यात आली, त्यानंतर न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केलाय. दरम्यान हल्ल्याच्या दिवशीपासून गंभीर दोघे भावावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. अखेर आज सोमवारी (3 एप्रिल) चेतन काळदाते याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चान्नी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे करत आहेत.


'या' कारणांमुळे घडलं हत्याकांड! 


आलेगाव इथे महादेव प्रल्हाद धात्रक, गणेश प्रल्हाद धात्रक, दीपक प्रल्हाद धात्रक यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील गणेश धात्रक याचा विवाह गावातीलच रहिवासी असलेले चेतन शामराव काळदाते (मृत) आणि दीपक शामराव काळदाते यांच्या सख्ख्या मावस बहिणीसोबत झाला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी गणेशची पत्नी म्हणजेच चेतनची बहिण आजारी पडली. गणेश हा बाहेरगावी गेला असल्यामुळे तिला उचारार्थ चेतन आणि दीपक काळदाते या दोघां भावांनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात तिच्यावर उपचार पार प्रक्रिया पार पडल्यानंतर तिच्यात सुधारणा झाली अन् तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र त्यावेळी चेतनने (मृत) रुग्णालयाचे बिल न भरल्यामुळे रुग्णालयाचे पैसे गणेशाला द्यावे लागले. या किरकोळ कारणावरुन गणेश धात्रकने चेतन तसेच त्याचा भाऊ दीपक याच्यासोबत वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी गणेश धात्रक याचे दोन भाऊ दीपक आणि प्रल्हाद धात्रक हे दोघेही घटनास्थळी दाखल झाले. अन् तिघांनी मिळून चेतन आणि दीपक काळदाते या दोघांना मारहाण करुन चाकूने वार केले. या हल्ल्यात चेतनच्या छातीवर गंभीर दुखापत झाली. तर दीपकच्या पाठीवर दुखापत झाली. या दोघांनाही रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केल्यानंतर सोमवारी उपचार घेत असलेला चेतन याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.


दोषींवर कारवाईशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, मृताच्या नातेवाईकांची भूमिका 


दरम्यान, या प्रकरणी तिन्ही दोषींवर कठोर कारवाई केल्याशिवाय मृतावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा मृताच्या नातेवाईकांनी घेतला आहे. सध्या या घटनेमुळे आलेगावात मोठा तणाव आहे. या पार्श्वभूमीवर चान्नी पोलिसांनी आलेगावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.