अकोला: अकोला (Akola News) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा गावातील एका घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे. चक्क 30 हजार रुपयांची सुपारी देऊन पत्नीनेच पतीचा काटा काढल्याची घटना पुंडा गावात घडली आहे. पतीच्या हत्येचा कट रचत त्याला आत्महत्येचं रूप देण्याचा प्रयत्न पोलीस तपासात उघड झाला आहे. सचिन घमरावं बांगर असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर डिगांबर प्रभाकर मालवे असं मारेकरी आरोपीचं नाव आहे. तर कांचन सचिन बांगर असं सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान पती दारू पिऊन सतत शारिरीक आणि मानसिक त्रास देत असल्याने सुपारी दिल्याचं पत्नीनं पोलीस तपासादरम्यान कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


... अन् तिने दिली पतीचीच 'सुपारी' 


अकोला जिल्ह्यातील दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम पुंडा येथे सचिन बांगर यांचा व्यायामासाठी लावलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही घटना 28 डिंसेबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरीने बांधल्याच्या खुणा दिसून आल्यात. पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आला. अन् येथूनच तपासाची चक्र फिरत प्रकरणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असता वैद्यकीय अहवालासह पोलीस तपासात सचिन याची हत्या झाल्याचे समोर आले. दरम्यान तपासावेळी सचिनची पत्नी कांचन हिची बारकाईने चौकशी केली असता धक्कादायक बाब उघडकीस आली. दरम्यान सचिन याच्या पत्नीनेच त्याच्या हत्येचं कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झालं. सद्यस्थितीत दहीहंडा पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात पत्नी कांचन बांगर आणि एका आरोपीला म्हणजेच मारेकऱ्याला अटक केली आहे. डिंगाबर प्रभाकर मालवे असं त्या मारेकरी आरोपीचं नाव आहे. आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी पुढील तपास दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत, भारती ठाकुर करत आहेत.


पतीच्या हत्येसाठी दिली 30 हजाराची सुपारी 


पती सचिन बांगर हे पास्टूल येथील रहिवासी असून त्याचे अकोट तालुक्यातल्या पुंडा येथील कांचन हिच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस व्यवस्थित गेले. दरम्यान सचिन याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर  तो पत्नी कंचन हिला सतत मारहाण व शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. तेव्हापासून म्हणजे मागील अडीच वर्षापासून कंचन ही माहेरी पुंडा राहायला गेली. दरम्यान, तिथेही पुन्हा सचिनचा त्रास सुरू झाला. अखेर या सर्व त्रासाला पत्नी कांचन त्रासली होती. यातूनत पतीचा काटा काढण्याचा निर्णय तिने घेतला. पुंडा गावातील शेजारी राहणाऱ्या डिगांबर प्रभाकर मालवे याला पती सचिनला जिवे मारून टाक, तुझ्या मुलीसोबतही त्याचा वाद झाला असून तिलाही त्रास आहे, असे म्हटलं. यासाठी 30 हजार रुपये देण्याचं आमिष तिने आरोपीला दिले. त्यानंतर डिगांबर याने कांचनच्या राहत्या घरी सचिनची दोरीने गळा आवळून हत्या केली. त्यांनतर त्याचा मृतदेह गावाच्या बाहेरील मुलांचे व्यायाम करण्याच्या लोखंडी अँगलला बांधून लटकवून गळफास घेतला असल्याचे दर्शवून दिले.


... अन् पोलीस तपासात फुटलं 'बिंग' 


सचिन आत्महत्या केल्याचा बनाव करत पत्नीने पोलिसात तक्रार केली. मात्र या संपूर्ण प्रकरणात आधीपासूनच पत्नीच्या हालचालीमुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यातच सचिनच्या अंगावर मारल्याच्या जखमा दिसून आल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. आणि यातूनच त्यांनी पत्नी कांचनची त्यांच्या 'पद्धती'ने चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. आणि यात पतीच्या त्रासाला कंटाळून आपणच पतीची हत्या केल्याचं तिने पोलीस चौकशीत कबुल केलं. त्या संपूर्ण घटनेमुळे पुंडा गावात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा तपास दहीहंडा पोलीस करत असून दोन्ही आरोपी अटकेत आहेत.